दौलताबादच्या दरवाजाला कंटेनर धडकून ढासळले चिरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद/दौलताबाद - दौलताबादकडून घाटाच्या दिशेने उभ्या असलेल्या ऐतिहासिक दिल्ली दरवाजाचे चिरे रविवारी (ता. १६) पहाटे कंटेनरच्या धडकेने ढासळले. पुरातत्त्व विभागाने वारंवार सूचना देऊनही या रस्त्यावरील अवजड वाहतूक पोलिस बंद करू शकले नाहीत. त्यामुळे दरवाजाच ढासळत चालला आहे.

औरंगाबाद/दौलताबाद - दौलताबादकडून घाटाच्या दिशेने उभ्या असलेल्या ऐतिहासिक दिल्ली दरवाजाचे चिरे रविवारी (ता. १६) पहाटे कंटेनरच्या धडकेने ढासळले. पुरातत्त्व विभागाने वारंवार सूचना देऊनही या रस्त्यावरील अवजड वाहतूक पोलिस बंद करू शकले नाहीत. त्यामुळे दरवाजाच ढासळत चालला आहे.

देवगिरी किल्ल्याच्या अंबरकोटाचा भाग असलेल्या दिल्ली दरवाजातून औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग जातो. ट्रक, कंटेनरच्या सतत वाहत्या रहदारीमुळे वेरूळ लेणींना हादरे बसत असल्यामुळे चाळीसगावकडे जाणारी अवजड वाहने अनेक वर्षांपासून दौलताबाद टी पॉइंटपासूनच कसाबखेडामार्गे वळवण्यात आली आहेत. रविवारी (ता. १६) पहाटे सहाच्या सुमारास भरधाव आलेला एक अवाढव्य कंटेनर या दरवाजाच्या कमानीला धडकून गेला. या धडकेत दरवाजाचे मोठे नुकसान झाले. कंटेनरवर पडून कमानीचे दगड एक किलोमीटर अंतरापर्यंत गेले. त्यानंतर कंटेनर चालकाने ते चिरे वाहनातून काढून रस्त्याच्या कडेला फेकून पोबारा केला. पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला; परंतु तोवर तो निघून गेला होता.

तटबंदीची हेळसांड
दौलताबाद, अब्दीमंडी आणि माळीवाडा या तीन गावांना कवेत घेणाऱ्या विस्तृत अंबरकोटाची अवस्था बिकट अवस्था झाली आहे. जागोजाग ढासळलेली तटबंदी आणि भिंतींवर उगवलेली झाडे यामुळे हळूहळू तट नामशेष होत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने चार वर्षांपूर्वी तटबंदी संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र, ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे हे काम रखडले. आपल्या गावाचा मोठा वारसा जपण्यासाठी किमान दौलताबादकरांनी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास तटबंदीचे संवर्धन करून विकास करता येईल, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारे हेळसांड झाल्यास पुढील पिढीला अंबरकोट फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल, अशी भीती इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत.

ट्रॅफिक बॅरिअर्स लावा
ढासळत चाललेल्या कमानीचे वृत्त ‘सकाळ’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने पाहणीही केली. ही पडझड नैसर्गिक नाही. मात्र दरवाजा संरक्षित स्मारक नसल्याने त्यावर खर्च करता येत नसल्याचे स्पष्ट झाले. दरवाजातून एसटी बसेस सुरक्षित पार होतात. मात्र मोठ्या व्होल्वो, लक्‍झरी बसेस आणि कंटेनर इथे अडकतात. त्यांना कसाबखेडामार्गेच सोडायला हवे. दिल्ली दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी हाईट रिस्ट्रीक्‍शन बॅरिअर्स लावल्यास हा प्रश्‍न तत्काळ सुटू शकतो, असे स्थानिक आणि अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बंदी असताना अवजड वाहतूक होतेच कशी?
अनेक वर्षांपासून या रस्त्याने अवजड वाहनांना बंदी घालूनही मोठमोठे कंटेनर, व्होल्वो बसेस याच मार्गाने वेरूळकडे जातात. वाहतूक नियंत्रणासाठी टी पॉइंटला पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावले आहेत. तरीही त्यांना गुंगारा देऊन ही वाहने या मार्गे दौलताबादकडे घुसतात. खुलताबादकडून घाटातून वेगात येणारी वाहनेही कमानीचा अंदाज न आल्यामुळे येथे धडकतात. या वाहनांवर पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही. मात्र, चिरीमिरी उकळण्यासाठीच या वाहनांना मुद्दाम यामार्गे जाऊ दिले जाते, असे ग्रामस्थ आणि पर्यटकांनी सांगितले. याबाबत ट्रॅफिकचे सहायक पोलिस आयुक्त डी. डी. शेवगण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु यामार्गे अवजड वाहतूक जाणे गैर असल्याचा दुजोरा उपायुक्त दीपाली घाडगे यांनी दिला.

Web Title: aurangabad marathwada news Daulatabad's door collapsed in a container