अकरावी ऑनलाईन प्रवेशास दोन दिवसांची मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सुट्यांमुळे खोळंबा, आतापर्यंत केवळ १८ हजार ८२६ अर्ज

औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला गुरुवार (ता. २९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मंगळवारी (ता. २७) ऑनलाईन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता; मात्र सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन दिवस वाढवून देण्यात आलेत.

सुट्यांमुळे खोळंबा, आतापर्यंत केवळ १८ हजार ८२६ अर्ज

औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला गुरुवार (ता. २९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मंगळवारी (ता. २७) ऑनलाईन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता; मात्र सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन दिवस वाढवून देण्यात आलेत.

यावर्षीपासून औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन करण्यात आले; मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी, रविवार (ता. २५) आणि सोमवार (ता.२६) या दोन दिवशी आलेल्या लागोपाठ सुट्या, प्रवेश मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकांकडून व्हेरिफाय करून घेणे यामुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज करता आला नाही. त्यामुळे या प्रक्रियेला आता दोन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ६ जूनपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली. मंगळवारपर्यंत (ता.२७) एकूण १८ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. शिवाय पाच हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली. 

इन हाऊस, मॅनेजमेंट कोट्याचा लाभ
प्रवेश प्रक्रियेत इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोटा हा शेवटच्या फेरीपर्यंत वापरता यावा, अशी मागणी मुख्याध्यापकांनी शिक्षण उपसंचालकांकडे बैठकीदरम्यान केली होती. ही मागणी मान्य केल्याने इन हाऊस कोटा व मॅनेजमेंट कोटा चौथ्या फेरीपर्यंत वापरता येणार आहे. आधी या कोट्याच्या शिल्लक जागा केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या फेरीअगोदर जमा करणे आवश्‍यक होते; मात्र आता मुख्याध्यापक हव्या त्या टप्प्यावर या दोन्ही कोट्यांच्या जागा जमा करू शकणार आहेत.

शाखा, महाविद्यालय निवडीचे स्वातंत्र्य
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना निवड केलेली शाखा, महाविद्यालय यात बदल करता येणार आहे; मात्र हा बदल फेरी संपल्यानंतर दिलेल्या कालावधीत करावा लागणार आहे. असे असले तरी एकदा महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित झाल्यास शाखेत बदल करता येणार नाही.  

ऑनलाईन प्रवेशादरम्यान आलेल्या अडचणी लक्षात घेता अर्ज करण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली; मात्र प्रवेश फेऱ्यांच्या वेळापत्रकात कोणतेच बदल करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, सर्व प्रवेश सुरळीत व्हावेत यासाठी वेळोवेळी येणारी अद्ययावत माहिती देण्यात येईल. 
- वैजनाथ खांडके,  शिक्षण उपसंचालक, तथा केंद्रीय प्रवेश निवड समिती सदस्य

Web Title: aurangabad marathwada news eleventh admission process time period increase