अकरावीच्या प्रवेश फेरीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील १०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील २२ हजार ९४० जागांसाठी यंदापासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. २०) जाहीर करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील १०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील २२ हजार ९४० जागांसाठी यंदापासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन करण्यात आले आहेत. 

यासाठी सहा जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १० जुलैला जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत १० हजार ४९२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. त्यात १४ जुलैला दुपारी बारापर्यंत ६ हजार ३८८ प्रवेश निश्‍चित झाले होते. गुरुवारी (ता. २०) केंद्रीय प्रवेश फेरीची दुसरी यादी सायंकाळी पाचला जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाचा क्रमांक टाकून ॲलॉट झालेले महाविद्यालय पाहता येईल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, दुसरी फेरी पूर्ण झाल्यावर मंगळवारी (ता. २५) रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीनंतरचे कट ऑफ सायंकाळी पाचला जाहीर करण्यात येणार आहे.

ठराविक कालावधीतच प्रवेश होणार दुसऱ्या फेरीत पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात सोमवारी (ता. २४) सायंकाळी पाचपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक असेल. दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येईल. तसेच २ ते १० पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत प्रवेश घेता येईल किंवा प्रवेश घ्यावयाचा नसल्यास असे विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्यासाठी पात्र असतील, असे विभागीय शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी कळविले आहे.
 

चार दिवसांत प्रवेश घ्यावा लागणार 
विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश २१ ते २४ जुलैला सकाळी १० ते सायंकाळी पाच अशा केवळ चार दिवसांत निश्‍चित करावा लागणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी आपल्या लॉगईनमध्ये ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रिंट काढून दर्शनी भागात लावावी, तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी संगणक कक्षात योग्य ते नियोजन करुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीकृत पावती देऊन योग्य ते शुल्क आकारून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा आहे. प्रवेश निश्‍चित झालेले विद्यार्थ्यांचे स्टेटस ऑनलाईन अपडेट करायचे आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संगणकीकृत पावती घेऊन दिलेल्या वेळेत कनिष्ठ महाविद्यालयाचे शुल्क भरून आपला प्रवेश निश्‍चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: aurangabad marathwada news eleventh admisssion second list declare