सातबारा कोरा होईना अन्‌ बॅंक दारात उभे करेना!

शेखलाल शेख
मंगळवार, 25 जुलै 2017

औरंगाबाद - कर्जमाफीचा अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, बॅंकासुद्धा गोंधळात आहेत. एकीकडे शासनाकडून कर्जमाफीची घोषणा; तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा अद्यापही कायम आहे. त्यामुळे सातबारा कोरा होईना अन्‌ बॅंक पीक कर्जासाठी दारात उभे करेना, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. 

कर्जमाफीचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. आता खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाल्याने पीक कर्ज वाढण्याची शक्‍यतासुद्धा मावळली आहे.

कर्जमाफीच्या आकड्यांच्या खेळात शासनाने फसविल्याची भावना सध्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या औरंगाबाद विभागात सर्व बॅंकांनी ८६८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. मागील वर्षी याच तारखेला तब्बल २ हजार ६१९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफीत सध्या आकडे, निकष, अटींचा खेळ सुरू असल्याने या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा मात्र भुगा झाला आहे. 

औरंगाबाद विभागात फक्त ८६८ कोटींचे पीक कर्ज
औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत खरीप हंगामासाठी ४ हजार ६४३ कोटी ७६ लाख ३९ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंदा कर्जमाफीचा संभ्रम आणि त्यानंतर कर्जमाफीच्या गुंत्याने पीक कर्ज वाटप कमालीचे मंदावले आहे. खरीप हंगामात २१ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागात सर्व प्रकारच्या बॅंकांनी फक्त १८.६९ टक्के म्हणजेच ८६८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले. यामध्ये व्यापारी (राष्ट्रीयीकृत) बॅंकांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवत फक्त १४ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे.

यात १ लाख ८८ हजार ६९१ शेतकरी सभासदांना पीक कर्जाचा लाभ झाला. या शेतकऱ्यांनी आपले मागील पीक कर्जाचे पैसे भरून नवीन कर्ज घेतले आहे. त्यांना अद्यापही कर्जमाफीचा कवडीचाही लाभ मिळाला नाही. औरंगाबाद विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ३८.२० टक्‍क्‍यांचे ३३४ कोटी रुपयांचे सर्वाधिक पीक कर्ज वाटप केले आहे. व्यापारी बॅंकांनी ४६६ कोटी रुपये कर्ज वाटप केले. 

हिंगोली, जालना पिछाडीवर
औरंगाबाद विभागात सर्वांत कमी पीक कर्जाचे वाटप हिंगोली जिल्ह्यात झाले आहे. येथे आत्तापर्यंत फक्त १०.९७ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले. हिंगोलीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ४३ कोटी, व्यापारी बॅंकांनी ४७ कोटी तर ग्रामीण बॅंकांनी फक्त ५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्ह्यात ८३ हजार ५७८ शेतकऱ्यांना ३७७ कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळाले आहे; तर जालना जिल्ह्यात १४७ कोटी, परभणीत २४५, हिंगोलीत फक्त ९७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले.

Web Title: aurangabad marathwada news farmer issue for loan