कांद्याने रडवेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची "मलमपट्टी'

शेखलाल शेख
गुरुवार, 6 जुलै 2017

औरंगाबाद - गेल्या वर्षी कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. अशा आर्थिक फटका बसलेल्या आणि जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये बाजार समित्यांत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदानासाठी 43 कोटी 48 लाख 38 हजार रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद - गेल्या वर्षी कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. अशा आर्थिक फटका बसलेल्या आणि जुलै व ऑगस्ट 2016 मध्ये बाजार समित्यांत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदानासाठी 43 कोटी 48 लाख 38 हजार रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांत कांदा विक्री करणाऱ्या 16 हजार 250 पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांची कांदा विक्री अनुदानाची रक्कम दोन कोटी 31 लाख 92 हजार 97 रुपये आहे. प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपये अनुदान दिले जाणार आहे. भावच नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांना चांगलेच रडविले होते. आता शासनाकडून कांदा उत्पादकांना अनुदान मंजूर करून त्यांच्या आर्थिक जखमांवर काहीशी मलमपट्टी करण्यात आली आहे.

जिल्ह्याला सव्वादोन कोटी
जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, पैठण, वैजापूर या पाच बाजार समित्यांमधील 16 हजार 250 शेतकरी लाभार्थी आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाची रक्कम 2 कोटी 31 लाख 92 हजार 697 एवढी होते. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी औरंगाबाद बाजार समितीचे 7 हजार 615, तर सर्वांत कमी 133 गंगापूर बाजार समितीत आहेत.

औरंगाबाद बाजार समितीत लाभार्थी शेतकरी जास्त असले, तरी लासूर स्टेशन बाजार समितीत सर्वाधिक 89 हजार 651 क्विंटल, तर वैजापूर बाजार समितीत 77 हजार 916 क्विंटल कांदा अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा या दोन महिन्यांच्या दरम्यान विक्री झाला.

जुलैअखेरपर्यंत मिळणार रक्कम
या योजनेअंतर्गत प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी पणन संचालक, पुणे यांना प्राधिकृत केले आहे. पणन संचालक अनुदानाची ही रक्कम शासकीय कोषागारातून काढून शासनातर्फे लाभार्थी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत वितरित करतील.

Web Title: aurangabad marathwada news farmer subsidy on onion