संतप्त नागरिकांनी फोडले फ्यूज कॉल सेंटर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शहरात भारनियमनाच्या विरोधात संताप सुरूच असून, शनिवारी (ता. सात) दुपारी महावितरण कंपनीच्या फ्यूज कॉल सेंटरची तोडफोड करीत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (सहा) एमआयएम पक्षाने लोडशेडिंगच्या विरोधात आंदोलन करून कार्यालयाची तोडफोड केली होती. 

महावितरण कंपनीच्या वतीने लोडशेडिंग सुरू करण्यात आल्यापासून शहरातील अनेक भागात आठ ते नऊ तास वीज गुल होत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे ऑक्‍टोबर हीटमुळे नागरिक त्रस्त आहेत. शुक्रवारी एमआयएम पक्षातर्फे महाविरणच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन करीत तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी टीव्ही सेंटर चौकात फ्यूज कॉल सेंटरची तोडफोड करण्यात आली. हडको एन-१२ परिसरातील महेश बनकर हे आपल्या भागातील महिला-पुरुषांना सोबत घेऊन दुपारी बारा वाजता टीव्ही सेंटर चौकातील महावितरणच्या कार्यालायात आले. त्यांनी आपल्या भागातील लोडशेडिंग बंद करावी किंवा फिडर बदलून द्यावे, अशी मागणी केली. अचानक आलेल्या या मोर्चामुळे कर्मचारी भांबावून गेले. आमच्या हातात काहीच नाही, निवेदन द्या, तुमच्या भावना अधिकाऱ्यांना कळविण्यात येतील, असे श्री. बनकर यांना सांगण्यात आले; मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मागणी मान्य होत नसल्याने त्यांच्यासह सोबत आलेल्या नागरिकांनी कार्यालयातील काचा, खुर्च्यांची तोडफोड केली. उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काबुक्‍की करण्यात आल्याने खळबळ उडाली. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले. या प्रकरणी अभियंता अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: aurangabad marathwada news fuse call center damage