छावणीत गॅस्ट्रोची साथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - छावणी परिसरातील अडीचशे ते तीनशे नागरिकांना शनिवारी (ता. ११) गॅस्ट्रोची लागण झाली. दुपारनंतर एकाच वेळेत मोठ्या संख्येने रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल झाल्याने अनेकांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागले. छावणी प्रशासन गंभीरतेने दखल घेतली नसल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

छावणी परिसरातील विविध भागातील अनेक नागरिकांना दोन दिवसांपासून पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत आहे. यामध्ये लहान मुले, महिला, पुरुषांचा समावेश आहे. यातील अनेकांनी उपचारासाठी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. तितक्‍याच संख्येने रुग्ण हे घाटी आणि खासगी रुग्णालयात दाखल झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे हा त्रास सुरू झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. छावणीच्या सामान्य रुग्णालयात येणारा प्रत्येक जण जुलाब, उलट्यांचा त्रास असल्याचे सांगत होता. सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्‍टर, कर्मचारीही हैराण झाले आहेत.

जुलाबामुळे शरीरात पाणी कमी झाल्याने रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती; परंतु जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना तिघांना सलाईन लावून उपचार करण्यात आले. रात्री अकरा वाजेपर्यंत अडीचशे रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे येथील डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news gastro sickness