आपत्ती व्यवस्थापनासाठी घाटी दक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घाटी रुग्णालय आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्ष झाले आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी मंगळवारी (ता. दोन) सकाळी क्‍लिनिकल विभागप्रमुखांची बैठक घेत त्यांच्यासह प्राध्यापकांना चोवीस तास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. तर परिचारिका, निवासी डॉक्‍टर, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घाटी रुग्णालय आपत्ती व्यवस्थापनासाठी दक्ष झाले आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी मंगळवारी (ता. दोन) सकाळी क्‍लिनिकल विभागप्रमुखांची बैठक घेत त्यांच्यासह प्राध्यापकांना चोवीस तास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. तर परिचारिका, निवासी डॉक्‍टर, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

जखमी रुग्णांना ‘घाटी’त दाखल केल्यानंतर त्यांच्या पॅथॉलॉजीच्या तपासण्या आणि क्ष-किरण विभागाच्या टेक्‍निशियन्सना कोणत्याही कागदपत्रांच्या कारवाईत न अडकता तत्काळ तपासण्या करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी अतिरिक्त नियुक्त करण्यात आल्याचे प्रभारी अधीक्षक डॉ. सय्यद अश्‍फाक यांनी सांगितले. 

तणावाच्या परिस्थितीत घाटीत सकाळी बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या रोडवलेली होती. दिवसभरात १७२३ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंदणी करण्यात आली. तर अपघात विभागात ३५ जखमी रुग्ण दाखल करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनासाठी लिथोट्रिप्सी वॉर्ड सज्ज करण्यात आला असून, त्यात मंगळवारी दिवसभरात २२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी जास्त जखमी ७ रुग्णांना वॉर्ड १७  मध्ये, एक महिला वॉर्ड २० मध्ये, तर वॉर्ड ११मध्ये एका वृद्धाला दाखल करण्यात आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. आमदार इम्तियाज जलील, संजय जगताप, अमित भुईगळ यांनी जखमी रुग्णांची भेट घेतली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी अपघात विभाग पॅथॉलॉजी आणि क्ष-किरण विभागाच्या कामकाजाची पाहणी करीत ड्यूटीवरील प्रत्येकाने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. रक्त व औषधीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याचे डॉ. अश्‍फाक यांना सांगितले; तसेच चारही ओटीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या रुग्णांना उपचार व वॉर्ड ११, १२, १३ मध्येही व्यवस्था करण्याचे परिपत्रक मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले आहे. के.के. ग्रुपच्या सदस्यांनाही मदतीसाठी हजर राहण्याचे त्यांनी सांगितले. सहा रुग्णवाहिकाही मदतीसाठी तैनात केल्या असून, सुरक्षा रक्षकांचा पहाराही वाढविण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीवर उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. अनिल धुळे, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. राहुल पांढरे, डॉ. विकास राठोड, डॉ. पंडित खरात, डॉ. शिवप्रसाद लक्ष ठेवून आहेत.

Web Title: aurangabad marathwada news ghati hospital alert for disaster management