महापालिकेकडून ‘आरोग्य’ची हेळसांड!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची दैना उडालेली असताना राज्य शासनाने ३८ कोटी रुपये खर्चून २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी इमारत उभारली. भाडेपट्टी आणि कमर्शिअल पाणीपट्टीपोटी बत्तीस लाख रुपये भरून चारइंची पाण्याचे कनेक्‍शन मिळाले. मात्र, महिनाभरापासून या नळाला पाण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वारंवार विनंत्या करूनही महापालिकेचे अधिकारी दाद द्यायला तयार नसल्याने मिनी घाटीच्या उद्‌घाटनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची ओपीडी आणि प्रसूतीची आकडेवारी धक्कादायक आहे. आरोग्याच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी घाटी आणि आरोग्य सेवाविभागाच्या सेवांवर महापालिका क्षेत्रातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यासाठी आरोग्यसेवा आणि वैद्यकीय सेवाविभागही तयार आहे. परंतु त्यांना महापालिका प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने दोन्ही विभागांचे अधिकारी जेरीस आले आहेत. मिनी घाटीसाठी किमान दररोज दोन लाख लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे. मात्र महापालिकेने दिलेल्या चारइंची नळाच्या जोडणीतून ५० हजार लिटर पाण्याची गरज पूर्ण होत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर याचा परिणाम मिनी घाटी सुरू करण्यावर होऊ शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे असहकार्य 
मिनी घाटीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मूलभूत सोयीसुविधांच्या तयारीची चाचपणी सध्या सुरू आहे. काही यंत्रसामग्री आणि साहित्य लवकरच प्राप्त होईल. मात्र, पाणीच नसेल तर रुग्णालय सुरू कसे करणार? यासाठी महापालिकेने सहकार्य करणे अपेक्षित आहे; पण त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य लाभत नसल्याची खंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड यांनी व्यक्त केली.

Web Title: aurangabad marathwada news ghati hospital issue