वंशाच्या दिव्यापेक्षा पणती उजळली

मधुकर कांबळे
बुधवार, 24 जानेवारी 2018

जिल्ह्यात गर्भलिंग निदान केल्याचे उघड झाल्यास कठोर कारवाई केली जाते. यामुळे चाचण्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. गावपातळीवर ‘आशा’ कार्यकर्तीमार्फत ट्रॅकिंग केले जाते. पहिली मुलगी असलेली माता दुसऱ्यांदा गर्भवती असेल तर तिच्यावर आशा कार्यकर्ती, परिचारिकांचे सातत्याने लक्ष असते.
- डॉ. डी. बी. घोलप, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी.

जिल्ह्यात तीन वर्षांत वाढला मुलींचा जन्मदर
औरंगाबाद - जिल्ह्यात यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढला. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ही आकडेवारी वाढून हजार मुलांमागे ९०० वरून ९३५ इतकी झाली असून, वंशाच्या दिव्यापेक्षा पणती उजळली असल्याचे चित्र आहे. राज्यात मुलींचे हेच प्रमाण हजार मुलांमागे ९०२ आहे.

मुलगाच वंशाचा दिवा असतो या गैरसमजातून ‘मुलगी नको’ म्हणणारी संस्कृती वाढीस लागली होती. परिणामी, गर्भातच कळी खुडल्या जात होती. यामुळे दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. परिणामी, गर्भलिंग निदान चाचणी कायद्याची जिल्ह्यात कडकपणे अंमलबजावणी सुरू झाली.

मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत असल्याने लोकांच्याही मानसिकततेत बदल होत असल्याचे मुलींच्या जन्मदरावरून स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, ‘‘मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवणे, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींना खात्रीचे शिक्षण, लिंग समानता यासाठी ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ योजना सुरू झाली. हजार मुलांमागे २०१४ मध्ये मुलींचे प्रमाण ९०० इतके होते ते दुसऱ्या वर्षी ९०७ इतके झाले.

२०१६ मध्ये यात पुन्हा वाढ होऊन ते ९२९ झाले; तर २०१७ मध्ये ९३० झाले. आता हे प्रमाण ९३५ एवढे झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आशादायी चित्र असून, मुलींच्या जन्मदर वाढीमध्ये औरंगाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे’’, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news girl birth rate increase