ग्रीनफिल्ड संकटात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई येथे झालेल्या बैठकीत ग्रीनफिल्ड प्रकारातील रस्ते, सायकल मार्ग या संकल्पना आहेत. त्या मुख्य शहरात म्हणजेच पॅनसिटी प्रकारात राबविणे गरजेचे आहे, अशी विनंती करण्यात आली. त्यावर सचिवांनी शासनाकडूनच याबाबत काही शिथिलता आणली जाणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात शासनाकडून लवकरच पत्र मिळणार आहे. त्यामुळे मुख्य शहरातील कामे करता येतील. 
- डी. एम. मुगळीकर, आयुक्‍त.

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकसित होणाऱ्या ग्रीनफिल्डचा निधी पॅनसिटी प्रकारात वळविण्याची मुभा महापालिकेला मिळणार आहे. शासनानेच यासंदर्भात संकेत दिले असून, लवकरच महापालिकांना पत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे चिकलठाणा परिसरात विकसित होणारे ग्रीनफिल्ड आता संकटात सापडले आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने या प्रकल्पात करण्यात येणाऱ्या कामांचे आराखडे तयार केले आहेत. एकूण १७३० कोटी रुपये खर्चाचा हा आराखडा असून, ११३० कोटी रुपये हे चिकलठाणा येथील ग्रीनफिल्ड प्रकारात, तर उर्वरित सहाशे कोटी रुपये पॅनसिटीतील उपक्रमांसाठी खर्च केले जाणार आहेत. मात्र, मुख्य शहरात रस्त्यासह इतर सोयीसुविधा नसताना ग्रीनफिल्ड विकसित कशासाठी करायचे? असे आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्प संचालकांच्या बैठकीत याबाबत सदस्यांनी मते मांडली होती. यावेळी शासनाने योजनेचे प्रारूप तयार केले आहे, त्यानुसारच काम करावे लागणार आहे, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. 

दरम्यान, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या राज्यातील आठ शहरांच्या आयुक्तांची मुंबईत बुधवारी (ता. तीन) बैठक घेण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. काही आयुक्‍तांनी ग्रीनफिल्ड (नवीन शहर विकास) प्रकारातील निधी पॅनसिटी (विद्यमान शहर) प्रकारात खर्च करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर याबाबत शिथिलता आणली जाणार आहे. लवकरच शासनाकडून महापालिकांना पत्र देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: aurangabad marathwada news greenfield in disaster