बिटकॉइनमध्ये औरंगाबादेतही लाखोंची गुंतवणूक

प्रकाश बनकर
सोमवार, 8 जानेवारी 2018

औरंगाबाद - जगभर वापरली जाणारी आधुनिक क्रिप्टोग्राफी (डिजिटल पेमेंट सिस्टिम) अर्थात बिटकॉइनच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध आणलेत. असे असतानाही शहरातील अनेकांनी यामध्ये लाखो रुपये गुंतविल्याची माहिती समोर आली आहे; तर नव्याने गुंतवणूक करण्यासाठी असंख्य लोक ब्रोकर्सकडे विचारणा करीत असल्याची माहिती एका ब्रोकरने ‘सकाळ’ला दिली. 

औरंगाबाद - जगभर वापरली जाणारी आधुनिक क्रिप्टोग्राफी (डिजिटल पेमेंट सिस्टिम) अर्थात बिटकॉइनच्या व्यवहारावर आरबीआयने निर्बंध आणलेत. असे असतानाही शहरातील अनेकांनी यामध्ये लाखो रुपये गुंतविल्याची माहिती समोर आली आहे; तर नव्याने गुंतवणूक करण्यासाठी असंख्य लोक ब्रोकर्सकडे विचारणा करीत असल्याची माहिती एका ब्रोकरने ‘सकाळ’ला दिली. 

बिटकॉइनकडे गुंतवणुकीसाठी एक पर्याय म्हणून पाहणारा वर्ग उदयास येत आहे. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र यात मोठी जोखीम आहे. कारण याचे मूल्य विशिष्ट काळात प्रचंड वाढले असले तरी ते तितक्‍याच वेगाने खालीही येते. असे असतानाही औरंगाबादेतही अनेकांनी बिटकॉइनमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, याबाबत गुंतवणूक करण्यासाठी शहरातील प्रत्येक ब्रोकरकडे दिवसाकाठी शेकडो लोक विचारणा करीत आहेत. 

काय आहे बिटकॉइन?
बिटकॉइन नावाच्या या चलनाला कुठल्याही देशाने मान्यता दिलेली नाही. हे एक आभासी चलन असून, पेमेंट वॉलेटप्रमाणे ते कार्य करते. वेबसाइट, ॲपच्या माध्यमातून एका विशिष्ट कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे एक व्यक्‍ती दुसऱ्या व्यक्‍तीला बिटकॉइन्स पाठवू शकते. प्रत्येक व्यवहाराची सुरक्षितता डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून तपासली जाते. वर्ष २००८ पासून bitcoin.org या संकेतस्थळावरून या बिटकॉइनचा व्यवहार सुरू झाला.

आजघडीला एका बिटकॉइनची किंमत दहा लाखांच्या घरात आहे. भारतात यास पूर्वी कोणतेही निर्बंध नव्हते; मात्र या आभासी चलनाचा गैरवापर पाहता रिझर्व्ह बॅंकेने या व्यवहारावर बरेचसे निर्बंध आणले आहेत.

गुजरातमार्गे चीनच्या माध्यमातून गुंतवणूक बिटकॉइनचा व्यवहार भारतात अधिकृत नाही. त्यामुळे शहरातील बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केलेल्यांपैकी काहींनी गुजरातमधील ब्रोकर्सच्या मध्यस्थीने चीनच्या माध्यमातून हे कॉइन खरेदी केले. सध्या पैसे वाढविण्यासाठी फायदेशीर गुंतवणूक म्हणून बिटकॉइनकडे पाहिले जात आहे. औरंगाबादच्या गुंतवणुकीसाठी गुजराती ब्रोकर्सची मदत घेतली जात आहे. यासह शहरातील काही ब्रोकर्सनीही यात गुंतवणूक केली आहे; मात्र त्यांना यातून फारसा काही लाभ झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. आरबीआयने बंदी आणूनही यातील गुंतवणूक वाढत असल्यामुळे तरुणवर्ग याकडे आकर्षित होताना दिसत असल्याचेही ब्रोकर्सनी सांगितले.

फसवणुकीचा धोका   
बिटकॉइनला मान्यताच नसल्याने त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते, याबाबत केंद्र सरकारने वेळोवेळी गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिलेला आहे; पण असे असतानाही यात गुंतवणूक वाढत आहे. दरम्यान, या आभासी चलनाच्या अनेक फेक वेबसाइट आणि ॲप तयार झाले आहेत. परिणामी, फसवणुकीचा धोका वाढला आहे.

Web Title: aurangabad marathwada news investment in bitcoin