जैतापूरचा प्रकल्प होणारच - डॉ. काकोडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

डार्विनची थिअरी आणि त्याला काही उदाहरणे आहेत. लोकांनी ते सिद्ध करून दाखविले आहेत. एखाद्या गोष्टीचे पुरावे सापडत नाहीत म्हणून तो मुद्दा चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही; पण पुरावे आणि सिद्धांत तपासण्यासाठी त्याचा अभ्यास व्हायला हवा.
- डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ

औरंगाबाद - अणुशक्ती प्रकल्प आणि त्यातून होणाऱ्या ऊर्जेसाठीचा आराखडा आपण तयार केला आहे. आपल्या देशात युरेनियम कमी असल्याने ‘थ्री स्टेज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तयार केले जाते. जैतापूरमध्ये फ्रान्सच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायची आहे. सध्या या प्रकल्पाला विरोध होत असला तरी तो अद्याप रद्द झालेला नाही; पण फ्रान्सच्या ज्या कंपनीशी आपण व्यवहार करीत होतो ती बदलली. आता नव्या कंपनीशी आपण बोलत आहोत. ते पूर्णत्वास आले की निविदा, विविध कामांची परवानगी निघेपर्यंत थोडा अवधी लागेल. हा प्रकल्प होणारच, असा विश्वास अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.

येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोमवारी (ता. २२) ‘इंडस्ट्रिअल ॲकेडेमिया समिट २०१८’ हा कार्यक्रम झाला. त्या वेळी डॉ. काकोडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऊर्जास्रोत आणि भविष्यातील ‘न्युक्‍लिअर प्लॅन’बद्दल डॉ. काकोडकर म्हणाले, ‘या क्षेत्रात आपल्याला तीन आव्हाने आहेत. ऊर्जेचे आयात करण्याचे बिल वाढतेय, त्याला अटकाव करण्याची गरज आहे. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. दळणवळणासाठी अजूनही पेट्रोल, गॅस लागत आहे. याबाबत आपण शाश्वत ऊर्जानिर्मिती करणे आवश्‍यक आहे. तिसरा मुद्दा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. यावर विचार, चर्चा होत असली तरी फार पर्याय दिसत नाहीत. आपल्याकडे खूप कोळसा आहे, असे आपण म्हणत असलो तरी तो पुरणारच नाही. त्यामुळे आपल्याला ऊर्जेसाठी पर्याय उपलब्ध करावेच लागतील.’ केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी डार्विनचा सिद्धांत चुकीचा असून तो शाळा, महाविद्यालयांमधून शिकविणे बंद केले पाहिजे, असे विधान येथे नुकतेच केले होते. त्यावर बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले, ‘भारताला मोठी परंपरा आहे. इथे माहिती आणि ज्ञानाचा खजिना आहे. पारंपरिक ज्ञानाचा आवाका मोठा आहे. त्याच्या आधारावर आपण पुढे जायला हवे. माहिती ही तावून-सुलाखून घेतली पाहिजे. माहितीचा अर्थ काय आहे, हे जाणून त्याचे कंगोरे तपासले जावेत. केवळ कोणी काहीतरी सांगितले म्हणून त्याला ज्ञानाचा मार्ग म्हणता येणार नाही. मुद्दा असा आहे, की आपल्याला आता पुढे जायचे की मागे हे ठरवावे लागेल. डार्विनची थिअरी आणि त्याला काही उदाहरणे आहेत. लोकांनी ते सिद्ध करून दाखविले आहेत. एखाद्या गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आज सापडत नाहीत म्हणून तो मुद्दा चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही; पण पुरावे आणि सिद्धांत तपासण्यासाठी त्याचा अभ्यास व्हायला हवा, त्याचे पैलू तपासले जावेत.’

Web Title: aurangabad marathwada news Jaitapur project will continue