जालना रोड, बीड बायपासच्या कामातील विघ्न हटेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

औरंगाबाद - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या माध्यामातून करण्यात येणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या कामातील विघ्न सध्या तरी हटताना दिसत नाही. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीतही यावर तोडगा न निघाल्याने हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

औरंगाबाद - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या माध्यामातून करण्यात येणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपासच्या कामातील विघ्न सध्या तरी हटताना दिसत नाही. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीतही यावर तोडगा न निघाल्याने हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

औरंगाबाद शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोड आणि बीड बायपास या दोन रस्त्यांचे रुंदीकरण एनएचएआयच्या माध्यमातून करण्याची घोषणा होऊन आता बराच काळ उलटला आहे. असे असले तरी शहरातील या प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी आणि धुळे-सोलापूर रस्त्याच्या कामासाठी राजधानी दिल्लीत मंगळवारी (ता. २५) सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार खैरे, एनएचएआयचे अध्यक्ष दीपक कुमार, नागपूरचे अधिकारी चंद्रशेखर आदींची उपस्थिती होती. या बैठकीत जालना रोड आणि बीड बायपास या ७८९ कोटींच्या दोन रस्त्यांसाठीच्या निविदा प्रक्रियांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले. यासाठीचा डीपीआर तयार असून तो मंत्रालयात पडून आहे. हे काम करण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने त्यासाठी आपण बुधवारी (ता.२६) नितीन गडकरी यांना भेटणार आहोत, असे श्री. खैरे यांनी सांगितले. दरम्यान, देवगिरी किल्ल्यालगत दक्षिण मुखी मारुती मंदिरापासून जाणाऱ्या रस्त्याचे काम धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामातच करण्यात येणार आहे आणि त्यासाठी २४ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे श्री. खैरे म्हणाले. 

बायपासची निविदा पंधरा दिवसांत निघणार  
सोलापूर-औरंगाबाद रस्त्याचे काम गती घेत असले तरी औरंगाबाद शहराच्या बाहेरील बायपास आणि त्यापुढील कन्नडपर्यंतच्या रस्त्याच्या निविदांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या निविदा १५ दिवसांत काढण्यात येणार असल्याचे एनएचएआयच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर साधारण  डिसेंबर महिन्यात या कामास सुरवात करण्यात येणार असल्याचे खासदार  खैरे यांनी सांगितले. 

खडकाचे नमुने घेण्यासाठी औट्रम घाटात जाणार 
धुळे- सोलापूर रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या औट्रम घाटाच्या बोगद्याच्या अलाईनमेंट आता बदलणार आहेत. ११ किलोमीटरचा हा बोगदा सात किलोमीटरवर आल्याने हे बदल करण्यात येणार आहेत. औट्रम घाटाचा डीपीआर तयार करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले खडकाचे नमुने घेण्यासाठी वन विभाग आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसह आगामी आठवड्यात आपण औट्रम घाटात जाणार असल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news jalana road beed bypass accident isue