ट्रकला दुचाकी धडकून जवान जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - उभ्या ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात लष्करातील जवान ठार झाला. भरत भास्करराव देशमुख (वय ३९, रा. चिकलठाणा, हनुमान चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) मध्यरात्री पावणेएक वाजेच्या सुमारास सेव्हनहिल उड्डाणपुलावर घडली.

औरंगाबाद - उभ्या ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात लष्करातील जवान ठार झाला. भरत भास्करराव देशमुख (वय ३९, रा. चिकलठाणा, हनुमान चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) मध्यरात्री पावणेएक वाजेच्या सुमारास सेव्हनहिल उड्डाणपुलावर घडली.

एक ट्रक (एमएच- १२, डीटी- ४४३३) सोमवारी मध्यरात्रीनंतर जळगाव येथून डाळ घेऊन सिडको चौकाकडून आकाशवाणीकडे जात होता. सेव्हनहिल उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराने या ट्रकला अडविले. साइड का दिली नाही, म्हणून दुचाकीस्वाराने ट्रकचालकाशी वाद घातला. त्यानंतर चालकाला मारहाण केली. यामुळे काही वेळ वाहतूक थांबली. सुमारे दहा मिनिटे दोघांचा वाद सुरू होता. यादरम्यान पावणेएकच्या सुमारास उड्डाणपुलावरून भरत हे दुचाकीवरून (एमएच- २०, बीयू- ५६५५) आले. त्यांच्या बाजूने काही वाहने होती. ट्रकच्या लगत येताच त्यांचे संतुलन बिघडले आणि ते ट्रकवर आदळले. ही धडक इतकी गंभीर होती, की दुचाकी ट्रकच्या खाली व भरत यांचे डोके ट्रकवर दणकन आदळले. या धडकेत ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर अन्य वाहनधारकांनी भरत यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भरत हे लष्करात नोकरीला होते. घटनास्थळी जिन्सी ठाणे आणि जवाहरनगर ठाण्याचे पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली; तसेच ट्रकचालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, पुढील तपास हवालदार मोहनसिंग कायटे करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news jawan death in accident