चिकलठाणा, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

उद्योजक बिले भरतात. त्यांना भारनियमनाचा त्रास होऊ नये म्हणून उद्योगांचा पुरवठा स्वतंत्र करण्यात यावा. उद्योजकतेकडे वळण्याचे उपदेश सरकार देत असताना तासन्‌तास वीज गूल होणे सगळ्या बाजूंनी नुकसान करणारे ठरते आहे. 
- आशिष गर्दे (उद्योजक, माजी अध्यक्ष, सीएमआयए)

वीज भारनियमन - उत्पादन यंत्रणा कोलमडली, सणासुदीत होणार गैरसोय

औरंगाबाद - महावितरणकडून शहरावर लादण्यात आलेल्या वीज भारनियमनाचा जबरदस्त फटका चिकलठाणा, रेल्व स्टेशन औद्योगिक वसाहतींना बसतो आहे. अनेक उद्योगांची प्रॉडक्‍शन लाईन कोलमडली असून, सणासुदीत कराव्या लागणाऱ्या उत्पादनावर याचे परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 

रहिवासी क्षेत्रात वसुली घटल्याने शहारावर लादण्यात आलेल्या भारनियमनाचे चटके आता औद्योगिक वसाहतीत जाणवू लागले आहेत. दोन किंवा तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या उद्योगांची यामुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. औरंगाबाद शहरालगत असलेल्या रेल्वे स्टेशन आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहती यापासून सुटलेल्या नाही. कोणतीही पूर्वकल्पना आणि माहिती न देता लादण्यात आलेले भारनियमन उत्पादकतेवर तत्काळ आणि दूरगामी परिणाम करणारी ठरत आहे. रहिवासी क्षेत्राच्या फिडर एकत्रितपणे कार्यरत असल्याने रहिवासी क्षेत्रासह औद्योगिक वासहतीसुद्धा या भारनियमनाच्या जाचात सापडल्या आहेत. या वसाहतींमध्ये लघु आणि मध्यम उद्योजक असल्याने चार ते आठ तासांचे भारनियमन सुरू असताना विजेची तजवीज करणारी यंत्रणा नसल्याने उत्पादन बंद ठेवावे लागत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा औरंगाबादेतील उद्योगांना होणार आहे. 

तत्काळ आणि दूरगामी परिणाम
दसरा आणि दिवाळी तोंडावर असल्याने सणासुदीचे उत्पादन हातावर आहे. अशा परिस्थतीत सुरू झालेल्या भारनियमनामुळे कामे होईनात, पण वेतन तर पूर्ण द्यावे लागणार आहे.

याशिवाय आलेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण होणार नाहीत, ज्याचा परिणाम कंपन्यांच्या नावावर होतो. आज वेळेत काम केले नाही तर उद्या कामाच्या ऑर्डर कोण देणार असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. 

शहरात तिसऱ्या दिवशीही भारनियमन
औरंगाबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेल्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा नसल्याने सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. तातडीने ही लोडशेडिंग थांबविण्याची मागणी विविध पक्ष संघटनांनी केली आहे. दरम्यान, महावितरणने सोमवारी अचानक शहरात तीन ते आठ तासांपर्यंत लोडशेडिंग सुरू केले आहे. 

कोळशाच्या तुडवड्याने राज्यभर वीज टंचाई निर्माण झाल्याने शहरातही भारनियमन सुरू करण्यात आले. यासाठी अधिक वीज गळती असलेल्या भागात भारनियमन करण्याचे सूत्र अवलंबिण्यात आले आहे. या अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीने महावितरणच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. वीज गुल होताच महावितरणच्या कार्यालयात फोन करून नागरिक भांडावून सोडत असल्याने कर्मचाऱ्यांनी फोन घेणे बंद केले आहे. त्यामुळे अनेक कार्यालयांतील फोन नुसतेच खणखणत होते. वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

आठवडाभर भारनियमन
राज्यासाठी महावितरणची सात हजार मेगावॉट आणि अदानी पॉवर कंपनीकडून तीन हजार ८५ मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना, अनुक्रमे साडेचार हजार व दोन हजार मेगावॉट वीज मिळत आहे. त्याचप्रमाणे ‘एम्को’ व ‘सिपत’ या पॉवर कंपन्यांकडूनही अनुक्रमे दोनशे व साडेसातशेऐवजी केवळ शंभर व साडेपाचशे मेगावॉट वीज मिळत आहे.
 एकूण मागणीपेक्षा विजेचा पुरवठा अर्ध्यावर आल्याने ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोळशाची उपलब्धता करण्यासोबतच महावितरणने तातडीने निविदा काढून ३९५ मेगावॉट वीज खरेदीची तयारी केली आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेला आणखी तीन-चार दिवस लागण्याची शक्‍यता आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास आठवडा लागण्याची शक्‍यता आहे. असे असले तरीही ही परिस्थिती नेमकी किती दिवस रीाहल याबद्दल अधिकारी निश्‍चित काही सांगण्यास तयार नाहीत.

Web Title: aurangabad marathwada news loadshading in aurangabad