कर्जमाफी नाही; तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

औरंगाबाद - 'शेतकरी संपावर जाणे हा सरकारसाठी चिंतनाचा विषय आहे. याकडे आम्ही संवेदनशीलतेनेच पाहातो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शेवटी चर्चेतूनच प्रश्‍न सुटू शकतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी काही कालावधी लागेल. शेतकरी बांधवांनी सरकारवर विश्‍वास ठेवून संप मागे घ्यावा'', असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (ता. दोन) पत्रकार परिषदेत केले.

शेतकऱ्यांच्या संपावर भूमिका स्पष्ट करताना मुनगंटीवार म्हणाले, 'सरकारने अडीच वर्षांत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु, यापेक्षा जास्त निर्णय घेण्याची आवश्‍यकता होती. जगाचा पोशिंदा असणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेले हे सरकार आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफी देणारे आम्ही कोण? शेतकऱ्याला कर्जमाफी नाही; तर संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. पूर्वीच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त झाला नाही; तर त्याच्या सातबाऱ्यावर नव्या कर्जाचा पुन्हा बोजा पडला. कर्जाच्या या दृष्टचक्रातून त्याला कायमचा बाहेर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

शेतकरी राजकारणाचा विषय होऊ शकत नाही
पंधरा वर्षे ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात सत्ता होती ते सरकार शून्य संवेदनशील होते. म्हणून जनतेने भाजपला निवडून दिले. त्यामुळे आमच्याकडून अपेक्षा वाढणे साहाजिक आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क जर कुणाचा असेल; तर तो शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकरी हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला.

Web Title: aurangabad marathwada news loanwaiver for farmer