महावितरणच्या संचालकपदाचे "सस्पेन्स' कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

बकोरियांची बदली होऊन आठवडा उलटला तरी स्वीकारला नाही पदभार

बकोरियांची बदली होऊन आठवडा उलटला तरी स्वीकारला नाही पदभार
औरंगाबाद - महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या सह-व्यवस्थापकीय संचालकपदी कुठल्याच अधिकाऱ्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. सुनील केंद्रेकर यांनी पद नाकारल्यानंतर प्रसाद रेशमे, की ओमप्रकाश बकोरिया या दोघांपैकी कोण पदभार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या पदावर बकोरिया यांची बदली होऊन आठवडा झाला; मात्र अजून ते रुजू झालेले नाहीत. त्यामुळे या पदाचा "सस्पेन्स' कायम आहे.

महावितरणच्या मराठवाड्यातील आठ आणि खानदेशातील तीन, अशा 11 जिल्ह्यांच्या वीज वितरण प्रणालीत सुधारणा करणे, वसुली वाढविणे व वीज गळती कमी करण्यासाठी ऑक्‍टोबर 2016 मध्ये प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या भागांत मोठ्या प्रमाणावर वीज गळती, वीजचोरी आणि थकबाकी आहे. थकबाकी वसूल करणे, महावितरणच्या सुविधा-सेवा सुधारणे, परिमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तीन प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, 22 एप्रिलला राज्यातील 31 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्यापैकी केंद्रेकर यांची महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या सह-व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली होती; मात्र त्यांनी पदभार घेण्यापूर्वीच पुणे येथील राज्याच्या कृषी आयुक्‍तपदी त्यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रेकरांची केलेली नियुक्‍ती ऊर्जामंत्र्यांना चांगलीच खटकली होती. त्यामुळे ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांत खडकेही उडाले. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी शुक्रवारी (ता. 12 मे) नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांची औरंगाबादच्या प्रादेशिक कार्यालयात बदली केली. रेशमे यांच्या जागी भालचंद्र खंदाईत यांनी मंगळवारी (ता. 16) नागपूर संचालकपदाचा पदभार स्वीकारला. रेशमे त्याच आठवड्यात पदभार स्वीकारणार होते; मात्र त्यातच 18 मे रोजी ओमप्रकाश बकोरिया यांची याच पदावर बदली झाल्याची माहिती समोर आली. यामुळे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचा पदभार ऊर्जामंत्र्यांचा अधिकारी स्वीकारणार की मुख्यमंत्र्यांचा, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. महावितरणच्या सह-संचालक पदावर बदली झाल्याची माहिती स्वत: बकोरिया यांनी माध्यमांना दिली होती. त्यांच्या बदलीला आठवडा उलटला तरीही त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही.

आज रुजू होण्याची शक्‍यता
ओमप्रकाश बकोरिया यांची बदली झाल्यानंतर गेल्या सोमवारी (ता. 22) ते सह-व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारणार होते; मात्र काही करणामुळे अडचणीमुळे त्यांनी पदभार स्वीकरलेला नाही. रेशमे की बकोरिया यांच्यापैकी कोण, या पदावर विराजमान होणार यांचे चित्र सोमवारी (ता. 29) स्पष्ट होण्याची शक्‍यता महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली.

Web Title: aurangabad marathwada news mahavitaran director suspense