मुख्य जलवाहिनीची झाली चाळणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्यांची अक्षरक्षः चाळणी झाली असून, दहा महिन्यांत तब्बल १२ वेळा फुटलेल्या या जलवाहिन्यांना शहरापासून ते पैठणपर्यंत जागोजागी ठिगळे लावण्यात आली आहेत. झीज झाल्याने दोन्ही जलवाहिन्यांची जाडी नऊ मि.मी.वरून तीन मि.मी. इतकी पातळ झाली आहे. जलवाहिन्यांचे आयुष्य संपल्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. 

औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्यांची अक्षरक्षः चाळणी झाली असून, दहा महिन्यांत तब्बल १२ वेळा फुटलेल्या या जलवाहिन्यांना शहरापासून ते पैठणपर्यंत जागोजागी ठिगळे लावण्यात आली आहेत. झीज झाल्याने दोन्ही जलवाहिन्यांची जाडी नऊ मि.मी.वरून तीन मि.मी. इतकी पातळ झाली आहे. जलवाहिन्यांचे आयुष्य संपल्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. 

महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सोमवारी (ता. ११) पाणीपुरवठा नक्षत्रवाडीपासून जायकवाडीपर्यंतच्या जलवाहिन्या, जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपगृहाची पाहणी केली. या वेळी जलवाहिनीचे आयुष्यच संपल्याचे निदर्शनास आले. सध्या जायकवाडीत भरपूर पाणी आहे; परंतु पाणीपुरवठा योजना सक्षम राहिलेली नाही. म्हणून तेथून पुरेसे पाणी उचलणे शक्‍य होत नसल्याची बाब या वेळी अधिकाऱ्यांनी मांडली. शहरासाठी सद्यःस्थितीत जायकवाडी येथून रोज १५० एमएलडी पाणी उचलले जाते. त्यातील १२५ एमएलडी पाणी शहरात पोचते. पूर्वी फारोळा येथून येणारे पाणी नक्षत्रवाडी येथील डोंगरावरील ‘एमबीआर’मध्ये नेऊन तेथून गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने शहराला पुरविले जात होते; परंतु आता फारोळा येथून पुरेसा दाब प्राप्त होत नसल्यामुळे हे पाणी डोंगरावर जात नव्हते. म्हणून डोंगराखालीच वर जाणाऱ्या पाईपला बायपास करून ते पाणी शहराकडे आणण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता बाबूराव घुले, सुहास जोशी, के. पी. धांडे आदी अधिकारी होते.

जलवाहिनीने गाठली चाळिशी  
महापालिकेच्या पहिल्या जलवाहिनीचे आयुष्य पाच वर्षांपूर्वीच संपले आहे. ही योजना सध्या ४५ वर्षे जुनी झाली आहे. दुसऱ्या योजनेलाही ३५ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांची पाणी वहन क्षमता कमी झाली आहे. जागोजागी पाईप झिजले आहेत. त्यांची जाडी नऊ मिमीवरून कुठे तीन मिमी, तर कुठे चार मिमी इतकी कमी झाली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे अधिक क्षमतेने पाणी शहराकडे आणणे अशक्‍य झाले आहे. थोडाही दाब वाढल्यास जलवाहिन्या फुटत आहेत, अशी माहिती या वेळी अधिकाऱ्यांनी दिली. 

शहरावर पुन्हा शटडाऊनचे संकट 
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल म्हणाले, ‘‘दुरुस्तीची अनेक कामे तातडीने करणे गरजेचे आहे; तसेच महावितरण कंपनीदेखील शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे याच काळात महापालिकेनेही शटडाऊन घेण्याची तयारी केली आहे. शटडाऊनच्या वेळेबाबत महावितरणशी चर्चा केली जात आहे. प्रामुख्याने टाकसाळी मंगल कार्यालयासमोरील, फारोळा येथील गळती बंद करणे, रेल्वेस्टेशनसमोर रस्त्यातील व्हॉल्व्ह बदलणे आदी कामे केली जाणार आहेत’’, असेही चहल म्हणाले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्या निकामी होण्याचा धोका आहे. सध्या जुन्या योजनेचे मेंटेनन्स करणे एवढेच अधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनीचे काम करावेच लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करू.  
- गजानन बारवाल, स्थायी समिती सभापती.

Web Title: aurangabad marathwada news main waterline leakage