औरंगाबादेत माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्यात अग्नितांडव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

वेल्डिंगच्या ठिणगीने पेटला भडका?
माणिक हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे, तर तळमजल्यात वेल्डिंग केली जात होती. जवळपास मोठा स्क्रॅप माल पडलेला होता. वेल्डिंगवेळी ठिणगी उडाली व स्क्रॅप मालावर पडल्याने माल पेटला. तेथून खरी आगीला सुरवात झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वेल्डिंग केली जात असेल तर अग्निशामक दलाला ही बाब कळविणे आवश्‍यक होते. तेथे विनापरवानगी वेल्डिंग केली जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद - शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी (ता. दोन) भीषण आग लागली. आगीत वैद्यकीय उपकरणे व प्रयोगशाळेची राखरांगोळी झाली. अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग रोखण्यात मोठे यश आले. आगीची झळ व धुराच्या लोटांमुळे हॉस्पिटलमधील काही रुग्ण अत्यवस्थ झाले; मात्र या गंभीर घटनेत अनेकांचे प्राण वाचविण्याचे सत्कार्य नागरिकांच्या अनमोल सहकार्यामुळे घडले.

माणिक हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास तळमजल्यात भीषण आग लागली. या घटनेची माहिती समजल्यानंतर एकच पळापळ सुरू झाली. तळमजल्याला आग लागल्याने पहिल्या मजल्यावर मोठे धुराळे उडाले. त्यामुळे येथील रुग्ण व नागरिकांनी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. नेमके काय झाले हे काही क्षण कळेनासे झाले होते. तरीही रुग्ण, डॉक्‍टर्स व इतर कर्मचारी जीव मुठीत धरून होते. आगीच्या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने अग्निशामक दलाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच जवानांची फौज घटनास्थळी रवाना झाली. तत्पूर्वी अख्खे जवाहरनगर पोलिस ठाणे तातडीने घटनास्थळी धावले. रुग्णालयाच्या खिडक्‍यांतून धुराचे लोट बाहेर पडत होते. आगीने रौद्र रूप धारण केल्याची जाणीव झाल्याने रुग्णालयाबाहेरील नागरिकही मदतीसाठी धावले.

यादरम्यान अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन तास आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांनीही मोलाची मदत केल्याने साडेअकराला लागलेली आग दुपारी दीडनंतर पूर्णपणे विझली. 

यानंतर जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची नोंद जवाहरनगर ठाण्यात झाली.

सर्व रुग्णालयांना केले ॲलर्ट
माणिक हॉस्पिटलमध्ये मोठी आग लागल्याचा संदेश रुग्णालय प्रशासनाने डॉक्‍टरांच्या ग्रुपवर पाठवला. त्यानंतर सर्व रुग्णालयांना ॲलर्ट करण्यात आले होते. आगीचे व्यापक स्वरूप पाहून शहरातील बहुतांश डॉक्‍टर, रुग्णवाहिका आणि सुरक्षारक्षकांची फळीच मदतीसाठी धावली. त्यामुळे मोठी मदत होऊ शकली.

रुग्णालयाची यंत्रणा फेल
माणिक रुग्णालयात आग नियंत्रण व सुरक्षेबाबत फारशी काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे आग जास्त वाढली. विशेषत: निष्काळजीपणामुळेही असंख्य रुग्णांचे जीव धोक्‍यात आले. ज्यावेळी आग लागली तेव्हाही फायर सेफ्टीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तेथे या बाबी सांभाळण्यासाठी ऑपरेटरच नसल्याचे आरोप अग्नितांडवानंतर होत आहेत.

तळमजल्यातील पॅनल सर्किटला आग लागली. व्हेंटिलेशन नव्हते, त्यामुळे तळमजला पूर्णपणे गरम झाला. आग त्यामुळे वाढली. रुग्णालयातील ३३ रुग्णांना सुखरूप बाहेर काढून इतरत्र रुग्णालयांत हलविण्यात आले          आहे. 
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन 

Web Title: aurangabad marathwada news manik Hospital Fire