रचलेल्या बनावानेच फोडले बिंग!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कटात सहभाग अन्‌ पोलिसांना केला नमस्कार

औरंगाबाद - पतीच्या खुनाची माहिती पत्नीने शेजाऱ्याला फोनवरून दिली. तो बनावच होता. शेजारी क्षणात घरी पोचला. त्या वेळी रक्तस्त्राव बंदच झाला होता. पोलिसांनी शेजाऱ्याला विचारणा केली, तेव्हा त्यानेही हीच बाब सांगितली. खुनानंतर रक्तस्त्राव लगेचच बंद होऊ शकत नाही. खून अर्ध्या तासापूर्वी झाल्याची बाब पोलिसांना समजली. अर्थातच पत्नीने जाणीवपूर्वक उशिरा कळविले, हा धागा त्यांनी पकडला. पोलिसांच्या उलटतपासणीत पत्नी अडकली अन्‌ खुनाचे बिंग फुटले.

कटात सहभाग अन्‌ पोलिसांना केला नमस्कार

औरंगाबाद - पतीच्या खुनाची माहिती पत्नीने शेजाऱ्याला फोनवरून दिली. तो बनावच होता. शेजारी क्षणात घरी पोचला. त्या वेळी रक्तस्त्राव बंदच झाला होता. पोलिसांनी शेजाऱ्याला विचारणा केली, तेव्हा त्यानेही हीच बाब सांगितली. खुनानंतर रक्तस्त्राव लगेचच बंद होऊ शकत नाही. खून अर्ध्या तासापूर्वी झाल्याची बाब पोलिसांना समजली. अर्थातच पत्नीने जाणीवपूर्वक उशिरा कळविले, हा धागा त्यांनी पकडला. पोलिसांच्या उलटतपासणीत पत्नी अडकली अन्‌ खुनाचे बिंग फुटले.

पत्नीवर संशय बळावल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनी लगेचच एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज गोळा केले. त्या वेळी स्पोर्ट बाईकवर दोन तरुण आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी माहिती घेतली असता, घटनेच्या एक दिवस आधी पांढऱ्या रंगाची कार होळकर यांच्या घरासमोर होती, अशी माहिती तेथील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिली. ‘तौशिफही स्टनर गाडीवर रात्री अकरा व त्यानंतर तीनला होळकर यांच्या घरासमोर दिसला व गाडी होळकर यांच्या घरासमोरच सकाळपर्यंत होती. मात्र, त्याच्याकडे गाडी नाही; पण तौशिफने काय गडबड केली’ हे माहिती नसल्याचे त्या नागरिकाने सांगितले; तसेच गणोरे व तौशिफ एकाच कारने पाचच दिवसांपूर्वीही येथे येऊन गेल्याचे पोलिसांना समजले. हा धागा पोलिसांना पुरेसा होता. त्यांनी तौशिफला जुना बाजार येथून ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर बाबूला ताब्यात घेतले. 

ही कारवाई सहायक आयुक्त रामेश्‍वर थोरात, निरीक्षक मधुकर सावंत, घनश्‍याम सोनवणे, नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, संजय धुमाळ, विकास माताडे, विजयानंद गवळी, सिद्धार्थ थोरात, राहुल हिवराळे, योगेश गुप्ता, हिवराळे, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, संजीवनी शिंदे, रत्नाकर मस्के, नितीन धुळे, सुधाकर राठोड यांच्या पथकाने केली.

पोलिसांना घातला नमस्कार
खुनानंतर किरण गणोरे हा घटनास्थळी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आला. तेथे एका पोलिसाला त्याने नमस्कारही घातला; पण त्या वेळी पोलिसांना त्याचा संशय आला नाही. मात्र, तौशिक व बाबूची चौकशी; तसेच भाग्यश्रीचा बनाव तिची गणोरेशी असलेली ओळख या सर्व बाबींमुळे खुनाचा छडा लागला. 

आता करते पश्‍चात्ताप...
पतीचा खुनाचा कट व त्यानंतर खून यामुळे पत्नी भाग्यश्री बैचेन झाली. खुनानंतर मोठा पश्‍चत्तापही झाला; तसेच हातून चूक घडली, अशा शब्दांत तिने पोलिसांपुढे आपली भावना व्यक्त केली. दोन लाखांच्या सुपारीत तिघांचे वाटे ठरले होते. तौशिफ व बाबू यांना दीड लाख, तर किरणला पन्नास हजार रुपये मिळणार होते.

तत्काळ पंधरा हजारांचे बक्षीस
मुख्यालय उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखा पोलिसांना पंधरा हजारांचे बक्षीस दिले. उपायुक्त राहुल श्रीरामे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सांवत, सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांची या वेळी उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news murder case