निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सरकारचे खंडपीठात आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

औरंगाबाद - खर्डा (जि. नगर) येथील नितीन आगे खून प्रकरणात दहा जणांची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाला सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. निर्दोष मुक्त केलेल्या संशयित आरोपींना शिक्षा द्यावी किंवा खटल्याची सुनावणी नव्याने घ्यावी, अशी विनंती करण्यात आल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी दिली.

खर्डा येथील नितीन आगे या तरुणाचा 28 एप्रिल 2014 रोजी मारहाण करून खून करण्यात आला. याची तक्रार नितीनच्या वडिलांनी दिली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीनंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी सर्व म्हणजे दहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षाला अपील दाखल करण्याची मुदत 90 दिवसांची असते, मात्र या प्रकरणात तीस दिवसांत अपील दाखल करण्यात आले. नितीनचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्याच्या अंगावर असलेल्या जखमा मृत्यूपूर्वीच्या असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.

साक्षीदार बहीण दीपाली सोनवणे, रेखा आगे (आई), दुर्गा आगे या तिघांच्या साक्षीमध्ये नितीनला शाळेत मारहाण झाल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपींनी नितीनला कान्होबा मंदिराकडे नेले, असे त्या वेळी नितीनच्या आई व बहिणींना सांगितले. त्यानुसार आई व बहिणी मंदिराकडे गेल्यावर त्यांना नितीन झाडाच्या फांदीला लटकलेला दिसला. दोघी बहिणी नितीनचा शोध करत असताना, दुचाकीवरून गावाच्या दिशेने जाणाऱ्या आरोपींनी नितीनचे कामच केले असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह आढळून आला असल्याचे अपिलात नमूद केले आहे.

संशयित आरोपींच्या ताब्यातून नितीनचे ओळखपत्र, मोबाईल जप्त करण्यात असल्याचे सरकार पक्षाने अपिलामध्ये सिद्ध केलेले आहे. त्यामुळे साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निर्दोष मुक्ततेचा आदेश रद्द करावा, सर्व आरोपींना दोषी ठरवून शिक्षा द्यावी किंवा खटला नव्याने सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे पाठविण्यात यावा, अशी विनंती अपीलमध्ये करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news nitin aage murder case court