वीज गेल्याने पुन्हा पाणी गुल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पंप हाऊसमध्ये पुन्हा बिघाड - रविवारचे पाणी आज मिळणार

पंप हाऊसमध्ये पुन्हा बिघाड - रविवारचे पाणी आज मिळणार

औरंगाबाद - जायकवाडी पंप हाऊसमध्ये महापालिकेच्या विद्युत केंद्राचा वीजपुरवठा शनिवारी (ता. १९) पुन्हा खंडित झाला. तसेच रविवारी (ता. २०) पहाटे पंप हाऊस सुरू केल्यावर ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी साडेतीन ते रविवारी पहाटे साडेचारपर्यंत नऊ वेळेस वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास कशीबशी दुरुस्ती झाली खरी; मात्र पाण्याच्या टाक्‍यांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे पाण्याचे नियोजन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. 

जायकवाडी पंप हाऊस परिसरात महापालिकेच्या विद्युत केंद्रात आणि ट्रान्स्फॉर्मरमध्ये सतत बिघाड होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळा चुकत आहेत. गेल्या आठवड्यात बिघाड झाल्याने शहरात पाणी आले नव्हते. त्यानंतर पुन्हा शनिवारी विजेचा लपंडाव आणि ट्रान्स्फॉर्मर बिघाडामुळे शहरात पाणीच आले नाही. जुन्या शहरातील पाण्याच्या टाक्‍यांत पुरेसा पाणीसाठा न झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तर उर्वरित भागातील पाण्याच्या टाक्‍यांत पाणीच आले नाही. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता, तिथे सोमवारी पाणी दिले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली. त्यानुसार सायंकाळपासून पाणी येण्यास प्रारंभ होऊन पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता अशोक पद्मे, के. पी. धांडे यांनी दिली.

Web Title: aurangabad marathwada news no water by electricity close

टॅग्स