किरायाच्या सायकलीवर महापालिकेत आले पदाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

औरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापौर, आयुक्‍त आणि अन्य अधिकारी, पदाधिकारी सोमवारी (ता. पाच) चारचाकी वाहनाऐवजी सायकलने महापालिकेत दाखल झाले. महापौर, आयुक्‍त, भाजप गटनेत्यांशिवाय उर्वरित पदाधिकाऱ्यांनी किरायाच्या सायकली आणल्या. महापालिकेत सर्वजण दाखल होताच त्यांच्यापाठोपाठ येऊन सायकल मालकाने त्या लोडिंग रिक्षात भरून परत नेल्या.

पर्यावरण संवर्धनासाठी एक दिवस का होईना सायकलीवर प्रवास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आयुक्‍तांच्या दिल्लीगेट येथील निवासस्थानापासून सायकल फेरीची सुरवात झाली. उपमहापौर स्मिता घोगरे यांनी या सायकल प्रवासाची सुरवात केली. महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते फेरोज खान, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, माजी उपमहापौर राजू शिंदे, नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, उपायुक्‍त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, सरताजसिंग चहल, विधी अधिकारी अपर्णा थेटे, उपअभियंता शफीयोद्दीन हे सायकलीने महापालिकेत आले. यात गजानन बारवाल, फेरोज खान, नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, शफियोद्दीन यांनी किरायाच्या सायलीवर महापालिका गाठली. पीरबाजार येथील सायकल मार्टवाल्याकडून पाच ते सहा सायकली आणल्या होत्या. सायकल मार्टवाल्याने महापालिकेमध्ये सर्वजण पोचताच सायकली जमा करून लोडिंग रिक्षात टाकून नेल्या.

दुपारनंतर चारचाकींची गर्दी
पर्यावरणदिनी महापालिका प्रांगण "नो व्हेईकल झोन' करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. अधिकारी, पदाधिकारी सायकलीने महापालिकेत आले; मात्र दुपारनंतर महापालिकेच्या आवारात नेहमीप्रमाणे चारचाकी वाहनांची तोबा गर्दी झाली होती. सायंकाळी वाहने काढण्यासाठीही जागा राहिली नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांची वाहनधारकांसोबत वाहने लावण्यावरून वादावादीही झाली.

Web Title: aurangabad marathwada news officer municipal entry on cycle