रेल्वेकोच फॅक्टरी ही मोदींच्या त्रिसूत्रीचे प्रतीक - पीयूष गोयल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मराठवाडा सुजलाम्‌ सुफलाम्‌ करू - मुख्यमंत्री
मराठवाडा, विदर्भाला प्रथम प्राधान्य, हा आमच्या सरकारचा अजेंडाच आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करून सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनवू.  तुम्ही लातूरचा परीक्षेचा पॅटर्न तयार केलात. मी लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न विकसित करून तो साऱ्या महाराष्ट्राला दाखवतो, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या ‘स्पीड, स्किल आणि स्केल’ या त्रिसूत्रीनुसारच रेल्वेकडून विकासाचे काम सुरू आहे. लातूरची रेल्वेकोच फॅक्टरी ही या त्रिसूत्रीचे प्रतीक आहे. या फॅक्‍टरीच्या माध्यमातून लातूरच्या युवकांना त्यांचे कौशल्य येथेच अजमावून रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. 

श्री. गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,  खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, महापौर सुरेश पवार,  मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांच्या उपस्थितीत मराठवाडा रेल्वेकोच फॅक्‍टरीसाठी भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता. ३१) सायंकाळी झाला. 

जिल्हा क्रीडा संकुलात  झालेल्या या सोहळ्यात श्री. गोयल म्हणाले, ‘रेल्वेकडून महाराष्ट्रासाठी भरीव निधी दिला जात आहे. पूर्वीच्या सरकारने पाच वर्षांत सहा हजार कोटींचा निधी दिला, तर आमच्या सरकारने चार वर्षांत पंचवीस हजार कोटींचा निधी दिला आहे. रेल्वेबोगी फॅक्‍टरी प्रकल्प मंजुरीची वेळ आली तेव्हा मराठवाड्याच्या विकासासाठी लातूरचे नाव पुढे आले. हा प्रकल्प लातूरमध्ये यावा, यासाठी राज्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी माझी झोप उडविली. त्यांचा व अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे लातूरवर शिक्कामोर्बत केले. त्यानंतर जागेसह अनेक अडचणी पुढे आल्या तेव्हा लातूरसाठी वाट्टेल ती मदतीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. याशिवाय लातूरच्या फॅक्‍टरीत उत्पादित सर्व बोगी महाराष्ट्रातील मेट्रोसाठी खरेदीची हमीही त्यांनी दिली.’

राज्य सरकारची वेगवान साद
रेल्वे बोगी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र सरकारने वेगवान प्रतिसाद दिला. ३१ जानेवारीला प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली. त्यानंतर केवळ वीस दिवसांत जागा निश्‍चिती, करार आणि भूमिपूजनाची तारीखही निश्‍चित केली. एवढ्या कमी वेळेत झालेल्या या प्रक्रियांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तेवढ्याच ताकदीने प्रतिसाद दिला आणि आज भूमिपूजन होत आहे. आमचे सरकार आश्वासन अर्धवट सोडत नाही, तर ते पूर्ण करून दाखवते, असे गोयल म्हणाले. रेल्वेकोच फॅक्‍टरीत पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जाहीर करून फॅक्‍टरीच्या निमित्ताने अनेक नवीन उद्योग व व्यवसाय सुरू होऊन मोठा रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

श्री. फडणवीस म्हणाले, ‘मंजुरी मिळाल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत भूमिपूजन झालेला रेल्वेचा हा पहिलाच कारखाना आहे. तातडीने पावले उचलणे, हे मोदी सरकारचे धोरणच आहे. आजवर मराठवाड्यात अनेक कामांचे भूमिपूजन झाले; पण त्यानंतर त्या जागेत काहीही घडले नाही. असे आमच्या सरकारकडून होणार नाही.’ जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्गासह विविध विकासात्मक उपक्रमांचा ऊहापोह त्यांनी केला.

Web Title: aurangabad marathwada news railway coach factory narendra modi piyush goyal