दोन पावसांत खड्डे पडले उघडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन विहिरीकडे जाणाऱ्या तीस रस्त्यांवर मुरूम, खडी टाकून खड्ड्यांची मलमपट्टी करण्याचा महापालिका प्रशासनाने केलेला प्रयत्न पावसाने उघडा पाडला आहे. आठवडाभरात झालेल्या दोन मोठ्या पावसातच खडी, मुरूम वाहून गेल्याने खड्डे उघडे पडले असून, साडेचार लाखांच्या खर्चावर पाणी फिरले गेले आहे. 

औरंगाबाद - गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन विहिरीकडे जाणाऱ्या तीस रस्त्यांवर मुरूम, खडी टाकून खड्ड्यांची मलमपट्टी करण्याचा महापालिका प्रशासनाने केलेला प्रयत्न पावसाने उघडा पाडला आहे. आठवडाभरात झालेल्या दोन मोठ्या पावसातच खडी, मुरूम वाहून गेल्याने खड्डे उघडे पडले असून, साडेचार लाखांच्या खर्चावर पाणी फिरले गेले आहे. 

शहरातील मुख्य व गल्ली- बोळांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक गेल्या तीन महिन्यांपासून त्रस्त आहेत. अनेक ठिकाणचे खड्डे जीवघेणे असून, विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांत वाहने आदळल्याने अपघात घडत आहेत. वारंवार तक्रारी करूनदेखील महापालिका अधिकारी दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्या वेळी केवळ आश्‍वासनांवर बोळवण करण्यात आली.

दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्यामुळे नगरसेवकांनी किमान विसर्जन मार्गावरील खड्डे तरी बुजविण्यात यावेत, अशी मागणी  लावून धरली. त्यानुसार बैठका झाल्या, नियोजन करण्यात आले; मात्र ते कागदावरच राहिले. शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी थेट आयुक्तांना धारेवर धरल्यानंतर खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली; पण केवळ मुरूम व खडी टाकून मलमपट्टी करण्यात आल्याने केवळ दोन पावसात पुन्हा खड्डे उघडे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनधारक त्रस्त आहेत.

तीस रस्त्यांवर खड्डे 
शहरात तेरा ठिकाणी गणेश विसर्जन विहिरी असून, या विहिरींना जाणाऱ्या रस्त्यांसह इतर अशा तीस रस्त्यांवर महापालिकेने पॅचवर्क केले होते; मात्र आठवडाभरात दोन मोठे पाऊस झाल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले असून, मुरूम-खडीच्या पॅचवर्कसाठी खर्च केलेल्या साडेचार लाख रुपयांवर पाणी फिरले गेले आहे. 

आदेशाला बगल 
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची न्यायालयानेदेखील दखल घेतली होती. मुरूम-खडी न टाकता डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले होते; मात्र या आदेशाला बगल देत महापालिका प्रशासनाने मुरूम, खडी टाकूनच रस्त्यावरील खड्डे बुजविले. त्यामुळे नागरिकांचा त्रास अद्याप कायम आहे.

Web Title: aurangabad marathwada news road in hole by rain