आंबेडकरी संघटना, चळवळीतील नेत्यांचे शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास समर्थन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी भूमिका शहरातील आंबेडकरी संघटना, चळवळीतील युवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतली आहे. दोन महापुरुषांच्या आडून कुणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करू नये, असेही संबंधितांना सुनावण्यात आले.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी भूमिका शहरातील आंबेडकरी संघटना, चळवळीतील युवक, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत घेतली आहे. दोन महापुरुषांच्या आडून कुणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करू नये, असेही संबंधितांना सुनावण्यात आले.

सुभेदारी विश्रामगृहात गुरुवारी (ता. १४) ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर बैठक झाली. निवेदनात म्हटले, की पुतळ्याचा वाद निर्माण करून दोन समाजात दंगली पेटवण्याचे कटकारस्थान संघ, भाजप, शिवसेना यांसारख्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या पक्षसंघटनांनी आखले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते यात हात धुऊन घेत आहेत. आंबेडकरी जनतेचे विद्यापीठाशी भावनिक नाते आहे. नामांतराच्या जखमा सुकल्या नसताना काही संघटना जनतेला भडकवण्याचे काम करीत आहेत. यात आंबेडकरी जनता सामंजस्याची भूमिका घेणार असल्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस रिपाइं डेमोक्रेटिकचे प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, ज्येष्ठ नेते मुकुंद सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, रिपाइं (ए)चे श्रावण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, नगरसेवक कैलास गायकवाड, भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, माजी पोलिस अधिकारी दौलतराव मोरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, भीमसेन कांबळे, शाम भारसाखळे, सखाहरी बनकर, प्रा. विजयकुमार घोरपडे, सिद्धार्थ मोकळे, चेतन शिंदे, विजय वाहूळ, मुकेश खोतकर, गुल्लू वाकेकर, सागर कुलकर्णी, सचिन निकम, संदीप जमधडे, प्रमोद तायडे, अनिल मगरे, सोनू नरवडे, प्रकाश इंगळे, मेघानंद जाधव, संघर्ष सोनवणे, सुचित सोनवणे, नीलेश नरवडे, अमरदीप वानखडे, विशाल रगडे, कपिल बनकर, सचिन भुईगळ, अविनाश साठे, मुकेश गायकवाड, राहुल खंदारे, रत्नदीप कांबळे, ॲड. अतुल कांबळे, अविनाश कांबळे, एन. डी. बोधडे, आनंद भुईगळ, गणेश जायभाय, अनिल जाधव, डी. एम. मोरे, कुणाल राऊत, भाऊसाहेब तायडे, अनिल आहिरे, मंगेश साळवे, विजय बागूल, अनिल साळवे यांची उपस्थिती होती.

पुतळ्याचे काम त्वरित मार्गी लावा
विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नामांतर शहिदांचे स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू करावे; मात्र यानंतर विद्यापीठ परिसरात कुठल्याही पुतळ्याची स्थापना करण्यात येणार नाही, असा ठराव विद्यापीठाने जाहीर करावा, अशी भूमिका दिनकर ओंकार यांनी मांडली. आंबेडकरी पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्त्यांची सुभेदारी येथे शनिवारी (ता. १६) दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news shivaji maharaj statue