स्कील डेव्हलपमेंट सेंटर ठरविणार कंपन्यांच्या मदतीनेच अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘ॲरिक’मध्ये कुशल मनुष्यबळासाठी उद्योगांच्या अपेक्षांवरून कोर्सची निर्मिती

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत असलेल्या शेंद्रा येथील ‘ऑरिक’मध्ये कुशल मनुष्यबळासाठी स्कील डेव्हलपमेंट सेंटर प्रस्तावित आहे. या केंद्राची उपयुक्तता वाढविण्यासाठी येथे शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम औरंगाबादेत कार्यरत कंपन्यांच्या मदतीनेच तयार केले जाणार आहेत. 

‘ॲरिक’मध्ये कुशल मनुष्यबळासाठी उद्योगांच्या अपेक्षांवरून कोर्सची निर्मिती

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत असलेल्या शेंद्रा येथील ‘ऑरिक’मध्ये कुशल मनुष्यबळासाठी स्कील डेव्हलपमेंट सेंटर प्रस्तावित आहे. या केंद्राची उपयुक्तता वाढविण्यासाठी येथे शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम औरंगाबादेत कार्यरत कंपन्यांच्या मदतीनेच तयार केले जाणार आहेत. 

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरिक) येथे आणि औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींना लागणारे कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी औरंगाबादेत स्कील डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यामातून औरंगाबादेतील उद्योगांना अपेक्षित असलेले हात घडविण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येथील कंपन्या महत्त्वाची भूमिका बजाविणार आहेत. या अभ्यासक्रमाची निर्मिती कपन्यांच्या अपेक्षेनुसार केली जाणार आहे. कंपन्यांना उत्तम दर्जाचे उत्पादन करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, त्याचा वापर आणि दुरुस्ती याचा समावेश या अभ्यासक्रमांत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. हा विषय कंपन्या आणि ‘डीएमआयसी’च्या माध्यमातून संयुक्त पद्धतीने हाताळला जात आहे. यात ऑरिक, कंपन्या आणि केंद्र सरकार हे महत्त्वाचे घटक राहणार आहेत. याविषयी सध्या डीएमआयसी आणि औरंगाबादेत कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. या केंद्रासाठी ऑरिकमध्ये जागा उपलब्ध आहे; परंतु या स्कील डेव्हलपमेंट सेंटरची इमारत कोणी उभारायची याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. ही इमारत डीएमआयसीने उभारावी, असे कंपन्यांचे मत असले, तरी वाढणारा खर्च पाहता डीएमआयसीनेही यावर पर्यायांची शोधाशोध सुरू केली आहे. या जागेवरील इमारतीसाठी केंद्र सरकारकडून काय सहायता शक्‍य आहे, याची चाचपणी सध्या डीएमआयसीच्या वतीने सुरू आहे. हे केंद्रच कंपन्यांनी चालवावे, अशी अपेक्षा डीएमआयसीची आहे.

औरंगाबादेत प्रस्तावित असलेले स्कील डेव्हलपमेंट सेंटर हे डीएमआयसी आणि कंपन्यांचा ‘जॉईंट एफर्ट’ राहणार आहे. ऑरिकमध्ये या केंद्रासाठी इमारत उभारण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. कंपन्यांनी त्यांच्या गरजांनुसार येथील अभ्यसक्रम तयार व्हावा आणि त्यांनीच हे केंद्र चालवावे. त्यासाठी जागा ऑरिक देण्यास तयार आहे. 
- गजानन पाटील (सह-सरव्यवस्थापक, ऑरिक)

Web Title: aurangabad marathwada news skill development center company help syllabus