एसटीच्या परीक्षार्थींची एकच जन्मतारीख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळातर्फे बुधवारी (ता. 17) लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. मात्र, ज्या खासगी संस्थेकडे परीक्षेचे काम सोपवले होते, त्या संस्थेने राज्यभरातील हजारो उमेदवारांच्या जन्मतारखा बदलून सर्वांना समान एकच जन्मतारीख बहाल केली. अचानक झालेल्या या प्रकाराने संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर परीक्षार्थींची ओळख पटवून विना हॉलतिकीट परीक्षा घ्यावी लागली. या संस्थेने परीक्षा प्रवेशपत्रामध्येही प्रचंड चुका केल्या. परीक्षार्थींच्या नावाच्या जागेवर आधी वडिलांचे नाव, त्यानंतर उमेदवाराचे नाव, पुढे पुन्हा वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने टाकले होते. त्याचप्रमाणे राज्यातील हजारो उमेदवारांची 10/10/1990 अशी एकच समान जन्मतारीख छापून नाकर्तेपणाचा कळस केला. राज्यभर उमेदवारांची एकच जन्मतारीख कशी काय असू शकते, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. त्यानंतर मुंबई मुख्यालयाशी संपर्क साधल्यावर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये चूक झालेली असून, उमेदवारांचा युजर आयडी घेऊन त्यांना परीक्षेला बसू देण्यात यावे, असे सांगण्यात आले.
Web Title: aurangabad marathwada news st examiner one date

टॅग्स