करवसुली खासगीकरणावरून भाजपमध्येच महापौर पडले एकाकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण करण्याचा ऐनवेळी प्रस्ताव घुसडणारे महापौर भगवान घडामोडे आता पक्षातही एकाकी पडले आहेत. आमदार अतुल सावे यांनी प्रस्तावाला विरोध केला असून, सूचक अनुमोदक असलेल्या नगरसेवकांनी साथ सोडण्यास सुरू केली आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी चर्चा न करता प्रस्ताव मंजूर करणे मात्र चुकीचे आहे, असा चिमटा काढला आहे. 

औरंगाबाद - मालमत्ता करवसुलीचे खासगीकरण करण्याचा ऐनवेळी प्रस्ताव घुसडणारे महापौर भगवान घडामोडे आता पक्षातही एकाकी पडले आहेत. आमदार अतुल सावे यांनी प्रस्तावाला विरोध केला असून, सूचक अनुमोदक असलेल्या नगरसेवकांनी साथ सोडण्यास सुरू केली आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी चर्चा न करता प्रस्ताव मंजूर करणे मात्र चुकीचे आहे, असा चिमटा काढला आहे. 

महापौर श्री. घडामोडे यांनी घेतलेला मालमत्ता कर वसुलीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव वादग्रस्त ठरला आहे. मंगळवारी (ता. १९) झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. भाजपच्या काही नगरसेवकांनीच हा प्रस्ताव चुकीचा असल्याची माहिती सभागृहातून फोन करून शहराध्यक्ष किशनचंद तणवानी यांना दिली. त्यांनी तातडीने महापालिकेत धाव घेऊन पक्षाचा या प्रस्तावाला विरोध असल्याचे जाहीर केले. त्यांनतर बुधवारी (ता. २०) प्रस्तावाचे अनुमोदक असलेले सभागृहनेते गजनन मनगटे यांनी महापौरांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार करीत ठराव विखंडित करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. तसेच आमदार अतुल सावे यांनीदेखील या प्रस्तावाला विरोध करीत मुख्यमंत्र्यांकडे तो विखंडित करण्याची मागणी करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. आमदार सावे यांनी ठरावाबाबत महापौरांकडे विचारणा केली असता, त्यांनी पुन्हा समर्थनच केले. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांच्या घरी गुंड घुसण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे उत्तर त्यांनी आमदार सावे यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावावर सही करणाऱ्या भाजपच्या दोनपैकी एका नगरसेवकाकडे श्री. सावे यांनी विचारणा केली त्यावर त्यांनी माझी सही घेतली; मात्र त्यात काय होते मला माहीत नव्हते, अशी भूमिका घेतली. या वेळी एका नगरसेवकाने मात्र श्री. घडामोडे यांची बाजू घेतली. काँग्रेस, एमआयएमचे गटनेतेदेखील ठराव विखंडित करण्याची मागणी करणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

सभापतींनी दिला घरचा आहेर
स्थायी समिती सभापती गजानन बारवाल या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे या मताचा मीदेखील आहे; मात्र अशापद्धतीने चर्चा न करता तो मंजूर करणे चुकीचेच आहे. हा प्रस्ताव पुढे स्थायी समितीमध्ये आल्यास पक्षाच्या आदेशानुसार आपण निर्णय घेऊ.’

Web Title: aurangabad marathwada news tax recovery, Privatization bjp,