मोबाईलवर पाहा दूरदर्शनच्या पाच वाहिन्यांचे कार्यक्रम

संकेत कुलकर्णी
रविवार, 16 जुलै 2017

औरंगाबाद - वेगवेगळ्या ऑनलाइन चॅनेल्सच्या स्पर्धेत आता प्रसारभारतीनेही उडी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दूरदर्शनने पाच वाहिन्या मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरात १६ ठिकाणांपैकी मुंबई आणि औरंगाबादकरांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कुठलाही नेटपॅक मारावा लागणार नाही.

औरंगाबाद - वेगवेगळ्या ऑनलाइन चॅनेल्सच्या स्पर्धेत आता प्रसारभारतीनेही उडी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दूरदर्शनने पाच वाहिन्या मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरात १६ ठिकाणांपैकी मुंबई आणि औरंगाबादकरांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कुठलाही नेटपॅक मारावा लागणार नाही.

आजवर डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग - टेरेस्ट्रीयल (डीव्हीबी-टी) तंत्रज्ञानाने दूरदर्शनच्या वाहिन्यांचे प्रसारण होत होते. अँटिनाद्वारे होणाऱ्या या प्रसारणात अनेक अडथळे येत. त्यामुळेच डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे फावले आणि त्यांनी मार्केट काबीज केल्यामुळे त्यांच्या डिशवरून दूरदर्शन वाहिन्या बघितल्या जाऊ लागल्या. प्रसारभारतीनेही तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उतरत फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘डीव्हीबी-टी२’ हे विदेशी तंत्रज्ञान विकत घेतले. देशभरात १६ ठिकाणी ते बसवून चाचण्या घेतल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्रात मुंबईत आणि औरंगाबाद केंद्रावर बसविलेल्या डिजिटल टेरेस्ट्रीयल ट्रान्समीटरद्वारे चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता जाहिरातीद्वारे त्याला प्रसिद्धी दिली जात असल्याचे म्हैसमाळ येथील दूरदर्शन केंद्राचे अभियांत्रिकी सहायक उमाकांत सुरडकर यांनी सांगितले. पूर्णपणे मोफत असलेल्या या सेवेसाठी गरज आहे आपल्या अँड्रॉईड मोबाईलला एक लहानसे उपकरण जोडण्याची. ऑनलाइन खरेदी करता येणारे ‘टीव्ही ऑन गो’ हे डोंगल किंवा ‘डिजिदर्शन’ हे वायफाय राऊटर ‘ओटीजी’ सपोर्टद्वारे मोबाईलला जोडावे लागेल. त्याद्वारे वायफाय कनेक्‍ट करताच पाच डीडी वाहिन्या आपल्या मोबाईलवर पाहता येतील.

दिसताहेत या पाच वाहिन्या
सध्या डीडी नॅशनल, सह्याद्री, डीडी न्यूज, डीडी भारती आणि डीडी स्पोर्टस्‌ या पाच वाहिन्या मोबाईलवर पाहता येत आहेत. याचे डोंगल किंवा राऊटर्स विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध असले, तरी ते बाजारात उपलब्ध होण्यास आणखी काही वेळ लागणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news television 5 channel event on mobile