दीडशे फुटांवरही सापडेना पाण्याचा थेंब!

शेखलाल शेख
बुधवार, 4 एप्रिल 2018

औरंगाबाद - एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बेसुमार बोअर घेण्याचा सपाटा लावल्याने शहर व परिसरात जमिनीची चाळणी झाली आहे. प्लॉट, घर घेतले की अगोदर सर्रास बोअर घेतले जाते. बोअर कुठे, केव्हा, कधी घ्यावे, यासाठी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने मागील आठ ते दहा वर्षांत बोअर घेण्याऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. जमिनीत पाणीच नसल्याने अनेक भागांत दीडशे फुटांवरसुद्धा धुरळाच बाहेर येत आहे. 

किमान पिणे, वापरण्यासाठी पाणी हवे असेल तर २०० ते ३०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअर घ्यावा लागतो. तर काही भागांत ३०० फुटांपर्यंतसुद्धा पाण्याचा थेंब सापडेनासा झाला आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी शहरातील अनेक भागांत शंभर फुटांवरच पाणी लागत होते, अशी माहिती बोअरवेलचालकांनी दिली. आता शंभर फुटांवर पाणी नदी, कमी बोअरवेल्स असलेल्या भागातच लागते.

मशीनचालक परराज्यांतील
शहरात बोअरिंग व हातपंप टाकून देण्यासाठीची जवळपास ५० दुकाने असून, यामध्ये तमिळनाडूमधून आलेल्या बोअरवेल्सच्या मशीन आहेत. देशात काही ठिकाणी बोअरवर कडक निर्बंध असल्याने हे व्यावसायिक महाराष्ट्रासारख्या राज्यात जास्त आहेत.

बोअरचे पाणी फक्त वापरण्यासाठी
शहरातील बहुतांश नाल्यांत ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने त्याच्या कडेला घेतलेल्या बोअरला शंभर ते दीडशे फुटांवर पाणी लागते; मात्र हे पाणी दुर्गंधीयुक्त, खारट आहे. त्यामुळे ते घरात कपडे, भांडी, वाहने धुण्यासाठीच वापरले जाते.

ठळक मुद्दे
नवीन प्लॉटिंग, वसाहतींमध्ये पाण्याची व्यवस्थाच नाही. 
पाणी नसल्याने खोदकामातून हाती लागते दगड-मातीच.
काही ठिकाणी काळ्या पाषणामुळे दीडशे फूटच घेता येते बोअर.
आता शहरात सर्वच ठिकाणी हातपंप घेणे झाले बंद.
त्याजागी बोअर घेऊन त्यामध्ये बसवितात विद्युत मोटार.
शहरातील भागानुसार दर वेगळे, काही खडकाळ भागात जास्त दर
२०० फुटांच्या बोअरचा एकूण खर्च येतो २५ हजार रुपये. 
शहरात साधारणपणे साडेचार इंचांचा घेतला जातो बोअर.
मोठ्या प्लॉट, शेतात साडेसहा इंच आकारचे घेतात बोअर. 

दोनशे फूट बोअरसाठी २५ हजारांपेक्षा जास्तीचा खर्च 
पाण्यासाठी नवीन प्लॉटिंगवर बोअर घेण्याचा सपाटाच

Web Title: aurangabad marathwada news water level