पाण्याच्या टाक्‍या धोकादायक!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरासाठी लाइफलाइन असलेल्या जलवाहिन्यांसोबत पाण्याच्या ६३ टाक्‍यांचेदेखील आयुष्य संपले असल्याचा खळबळजनक खुलासा प्रशासनातर्फे मंगळवारी (ता. १९) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. त्यावर नगरसेवकांनी चिंता व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी करताच आयुक्तांनी सावरासावर करीत महिनाभरात पाण्याच्या टाक्‍यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येईल, असा खुलासा केला. पाण्याच्या टाक्‍यांच्या परिसरात झालेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश या वेळी महापौरांनी दिले. 

शहरातील पाण्याच्या टाक्‍यांच्या सफाईचा विषय शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. शहरात किती पाण्याच्या टाक्‍या आहेत, त्या वेळेवर स्वच्छ करून साफसफाईचे फलक लावण्याचे आदेश सर्वसाधारण सभेने दिलेले आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप केला. त्यावर कार्यकारी अभियंता चहेल यांनी ६३ जलकुंभापैकी ५१ टाक्‍यांचा वापर होतो. मार्च महिन्यात ३२ ठिकाणी स्वच्छता कंत्राटदाराकडून केली आहे. हे सांगतानाच चहेल यांनी सर्वच जलकुंभ जुने असून, ते कालबाह्य झाल्याचा गौप्यस्फोट केला. यावर नगरसेवक अवाक्‌ झाले. राजू वैद्य म्हणाले, की पाण्याच्या टाक्‍यांचे आयुष्य संपलेले असेल तर एखादी दुर्घटनाही होण्याचा धोका आहे. असे झाल्यास आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे पर्यायी उपाययोजना यावर प्रशासनाने करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. श्री. चहेल यांनी त्यासाठीच समांतर पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली होती, असे सांगितले. त्र्यंबक तुपे म्हणाले, की ‘समांतर’चे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

अशा स्थितीत पर्याय शोधणे आवश्‍यक आहे. यावर खुलासा करताना आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, की पाण्याच्या टाक्‍यांचे बांधकाम १९७२-७४ पासूनचे आहे. काही टाक्‍यांची पाहणी केली आहे; मात्र स्ट्रक्‍चरल ऑडिट केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. त्यासाठी शासकीय अभियांत्रिकीकडून महिनाभरात सर्व जलकुंभांचे ऑडिट केले जाईल. त्याचा अहवाल सभागृहासमोर ठेवू. सभागृहाच्या सूचनेप्रमाणे नंतर उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. दरम्यान, सुभाष शेजवळ पाण्याच्या टाकीला लागूनच अतिक्रमण होत असल्याची, तर मनोज गांगवे यांनी म्हाडा कॉलनी येथील पाण्याची टाकी टवाळखोरांचा अड्डा बनल्याची तक्रार केली. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी
नंदकुमार घोडेले व भाजप नगरसेवकांमध्ये या विषयावरून खडाजंगी झाली. कार्यकारी अभियंता चहेल हे अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी श्री. घोडले यांनी केली. याच वेळी प्रमोद राठोड व राज वानखेडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यावरून चांगलीच खडाजंगी झाली. महापौरांनी राजकीय मतभेद सभागृहाबाहेर ठेवा, असा टोला मारून दोघांना शांत केले.

Web Title: aurangabad marathwada news water tank dangerous