हाती येणाऱ्या पिकांवर पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - सलग तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह बरसणाऱ्या परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. १०) विविध जिल्ह्यांत झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून ऐन दिवाळीत घरात येणारे कापूस, सोयाबीन व मक्‍याचे पीक पाण्यात गेले आहे. तर विविध शहरांतील सखल भागांत पाणी शिरले असून, नद्यांनाही पूर आला आहे.

औरंगाबाद - सलग तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह बरसणाऱ्या परतीच्या पावसाने मंगळवारी (ता. १०) विविध जिल्ह्यांत झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून ऐन दिवाळीत घरात येणारे कापूस, सोयाबीन व मक्‍याचे पीक पाण्यात गेले आहे. तर विविध शहरांतील सखल भागांत पाणी शिरले असून, नद्यांनाही पूर आला आहे.

बीड जिल्ह्यात मंगळवारचा पाऊस अंगाचं पाणी-पाणी करणारा ठरला. शहरात नाल्या तुंबल्याने रस्त्यांवर घाण पाणी तुंबले होते. बाजारपेठांमध्येही दिवसभर बिकट अवस्था होती. पावसामुळे बिंदुसरा नदीपात्रातील पर्यायी पूल पुन्हा एका बाजूने खचल्याने वाहतूक काही काळासाठी बंद राहिली. केज, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्‍यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

लातूर जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून विविध भागांत पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या काढणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे. शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अहमदपूर, उदगीर, रेणापूर, लातूर, निलंगा, चाकूर, जळकोट व शिरूर अनंतपाळमध्येही पावसाने हजेरी लावली. 

जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने अक्षरशः झोडपून काढले. भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूरसह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सकाळी दहानंतर सुरू झालेल्या जोरदार पावसाने विद्यार्थ्यांसह नोकरदार व शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, काही ठिकाणी नद्यांना पूरही आला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही दुपारी दीड तास जोरदार पाऊस झाला, तर नांदेडमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दाबका (ता. उमरगा) येथील पाचपूल नदीच्या पात्रात २० वर्षीय युवक बुडाला. सायंकाळपासून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे उघडले आहेत. त्यातून दिवसभरात २३ हजार क्‍युसेक पाण्याचा गोदावरीच्या पात्रात विसर्ग झाला. परंतु सायंकाळी सात वाजता हा विसर्ग कमी करण्यात आला असून आता १८ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

मराठवाड्यातील स्थिती
बीड, जालना, लातूरसह मराठवाड्यात जोरदार पाऊस 
‘बिंदुसरा’वरील पर्यायी पूल पुन्हा खचला
‘जायकवाडी’चे उघडले १८ दरवाजे 
सखल भागांत साचले पाणी, नद्यांनाही पूर
कापूस, सोयाबीन व मक्‍याचे नुकसान  
उस्मानाबाद जिल्ह्यात युवक बुडाला

Web Title: aurangabad marathwada rain effect on agriculture