औरंगाबाद : बजेटचा फुटणार फुगा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला जेमतेम 600 ते 700 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होते; मात्र यंदाचे (2018-19) बजेट 1,864 कोटी रुपयांपर्यंत फुगविण्यात आले. त्या

औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला जेमतेम 600 ते 700 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होते; मात्र यंदाचे (2018-19) बजेट 1,864 कोटी रुपयांपर्यंत फुगविण्यात आले. त्यामुळे बजेटमधील शेकडो कामांना अद्याप सुरवातही झालेली नाही; तर दुसरीकडे तिजोरीची स्थिती आणीबाणीसारखी आहे. त्यातून धडा घेत यावर्षी उत्पन्नानुसार बजेट तयार करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

महापालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प असताना दुसरीकडे बजेटमधील आकडे विक्रम करत आहेत. यंदा तब्बल 1864 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सत्ताधाऱ्यांनी उत्पन्नाचे आकडे फुगवून दाखवीत बजेट वाढविले आहे. बजेटनुसार कामे करण्याची मागणी नगरसेवक लावून धरत आहेत. महापालिकेच्या तिजोरीची अवस्था मात्र सध्या चिंताजनक आहे. सुमारे 225 कोटी रुपयांची कंत्राटदारांची देणी आहेत, तर तेवढीच बिले येण्याची बाकी आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता आगामी आर्थिक वर्षाचे बजेट वस्तुस्थितीला धरूनच बनविण्याचे प्रशासनाने ठरविल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाण्याची शक्‍यता आहे. 
 
स्थायी, सर्वसाधारण सभेत वाढविली जातात कामे 
आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी प्रशासनातर्फे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले जाते. त्यात स्थायी समिती सुधारणांसह मंजुरी देते; मात्र स्थायी समितीच्या सदस्यांची कामे त्यात समाविष्ट केली जातात. पुढे सर्वसाधारण सभेत महापौरांना संपूर्ण अधिकार बहाल केले जातात. सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांच्या मागणीनुसार कोट्यवधी रुपयांची वाढ केली जाते. 

 

Web Title: Aurangabad Municipal Corporation budget of Rs 1,864 crore