तब्बल साडेसहाशे कोटींच्या कामांचे महापालिकेवर ओझे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट असताना अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची विकासकामे घुसडण्यात येत आहेत. त्यामुळे ‘स्पील’च्या कामांची यादी लांबलचक होत आहे. यंदा या कामांसाठी लागणाऱ्या निधीचा आकडा तब्बल ६४८ कोटींवर गेला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी प्रशासनानेच १,२७४ कोटींचे बजेट तयार केले आहे; मात्र अत्यावश्‍यक खर्च व उत्पन्नाचे स्रोत पाहता विकासकामांसाठी पैसेच शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेचे अर्थकारण गेल्या काही वर्षांपासून बिघडले आहे. अत्यल्प वसुली व अवाढव्य खर्च यामुळे कर्जाचा डोंगर वाढत असून, दुसरीकडे जनतेला दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनांची पूर्तताही होत नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांच्या कामांचा समावेश केला जातो; मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन, पाण्याचे वीज बिल, कर्जाचे हप्ते, इतर बांधील खर्च भागविण्यापुरताच पैसा महापालिकेच्या तिजोरीत येतो. त्यामुळे निधीअभावी उर्वरित कामे ‘स्पील’मध्ये टाकली जातात. प्रत्येक वर्षी किमान शंभर कोटींची कामे ‘स्पील’मध्ये जात असल्याने कामांचा आकडा ६४८ कोटींवर गेला आहे. यंदा प्रशासनानेच अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक १,२७४ कोटींवर नेले आहे. त्यात मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे; मात्र त्यासाठी पैसा येणार कोठून, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. सध्याचे महापालिकेचे उत्पन्न व आवश्‍यक खर्च याचे आकडे एकसमान आहेत. मोठ्या प्रकल्पांचा अंदाजपत्रकात समावेश करताना प्रशासनाने विचार केला नाही का? असा प्रश्‍न महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी केला. लेखा विभागाला भेट देऊन माहिती घेतली असता महापौरांनाच धक्का बसला. 

शंभर कोटींची देणी 
एकीकडे ‘स्पील’च्या कामांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कंत्राटदारांची देणीही वाढत आहेत. आजघडीला शंभर कोटींपेक्षा जास्त देणी महापालिकेला असून, जुनी देणी चुकती न केल्याने कंत्राटदार नवी कामे घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.

Web Title: aurangabad municipal work budget