खरिपाची पेरणी अर्ध्यावर थबकली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

औरंगाबाद - पावसाने सुरवात चांगली केल्यानंतर गत काही दिवसांत दडी मारली. त्यामुळे औरंगाबाद, जालना व बीड येथे खरिपाची पेरणी अर्ध्यावरच थबकली आहे. या तीन जिल्ह्यांत खरिपाच्या यंदा असलेल्या सरासरी 19 लाख 2 हजार 462 हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत आजवर केवळ 8 लाख 54 हजार 381 हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद - पावसाने सुरवात चांगली केल्यानंतर गत काही दिवसांत दडी मारली. त्यामुळे औरंगाबाद, जालना व बीड येथे खरिपाची पेरणी अर्ध्यावरच थबकली आहे. या तीन जिल्ह्यांत खरिपाच्या यंदा असलेल्या सरासरी 19 लाख 2 हजार 462 हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत आजवर केवळ 8 लाख 54 हजार 381 हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी झाली आहे. 

यंदा पावसाने सुरवात चांगली केल्याने वेळीच पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकं चांगली येतील अशी आशा होती; परंतु गत आठवडाभरापासून अपवाद वगळता सर्वदूर दडी मारलेल्या पावसामुळे पेरणी वा लागवड झालेल्या खरिपाच्या पिकांवर संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी विहिरी व इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर सुरू केला असून स्प्रिंकलर, ठिबक वा प्रसंगी हाताने पाणी घालून पीक वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांनी चालविली आहे. लवकरच पावसाने कृपा न केल्यास काही भागांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्‍यता शेतकरीवर्गातून व्यक्‍त केली जात आहे. 

आजवर खरिपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यात 3 लाख 97 हजार 378 हेक्‍टर, जालना जिल्ह्यात 1 लाख 75 हजार 515 हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यात पेरणी झालेल्या 2 लाख 81 हजार 488 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील धारूर, आष्टी, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील पेरणी क्षेत्राचा टक्‍का अजून दहाच्या पुढे सरकला नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यात सरासरी 60 हजार 921 हेक्‍टरच्या तुलनेत 6365 हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, पैठण, जालना जिल्ह्यातील जालना, परतूर वगळता इतर सर्व तालुके, बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी आणि शिरूर कासार वगळता सर्व तालुक्‍यांतील पेरणीचा टक्‍का 20 ते 48 टक्‍क्‍यांदरम्यान आहे. तीनही जिल्ह्यांच्या पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 58.15 टक्‍के, बीड जिल्ह्यात 42.76 टक्‍के, तर जालना जिल्ह्यात 31.29 टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील कपाशीच्या सरासरी 10 लाख 14 हजार 666 हेक्‍टर क्षेत्रापैकी 5 लाख 47 हजार 306 हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 2 लाख 49 हजार 760 हेक्‍टर, जालना जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 897 हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यातील 1 लाख 68 हजार 649 हेक्‍टरवरील कपाशीच्या क्षेत्राचा समावेश आहे. 

Web Title: aurangabad news agriculture