कृषी विकास योजनेसाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2017-18 अंतर्गत घटकनिहाय शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विभागस्तरावरून सर्व तालुका कृषी अधिकारी यांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे. औरंगाबाद कृषी विभागातील संबंधित योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांना फलोत्पादन विकासाला चालना मिळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, नियंत्रित शेतीअंतर्गत शेडनेट, प्लॅस्टिक, मल्चिंग, पॅक हाउस, कांदाचाळ उभारणी या बाबींचा समावेश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, कांदाचाळ उभारणी व यांत्रिकीकरण या बाबींचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2017-18 अंतर्गत घटकनिहाय पूर्वसंमतीपत्र देण्यात आली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाहिजे असलेल्या घटकाबाबत कागदपत्राची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांतील सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कागदपत्राची पूर्तता करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. या विशेष मोहिमेचा लाभ पूर्वसंमतीपत्र व कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

Web Title: aurangabad news agriculture development scheme special campaign