महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी घोडेबाजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी सध्या जोरदार घोडेबाजार सुरू असून, अपक्ष नगरसेवकांना चांगलाच ‘भाव’ आला आहे. युतीच्या घोषणेला जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याने काही अपक्ष नगरसेवक ‘उचल’ घेऊन याआधीच सहलीवर गेले आहेत; तर युतीच्या नगरसेवकांनी बुधवारी (ता. २५) सायंकाळी शहर सोडले. सहलीवर गेलेले नगरसेवक शनिवारी (ता. २८) शहरात परत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेत ११५ नगरसेवक असून, एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. शिवसेनेचे सर्वाधिक २८, त्यापाठोपाठ एमआयएम २४, भाजप २३, काँग्रेस ११ असे संख्याबळ आहे. शिवसेना-भाजपने युती करून ही निवडणूक लढली असली तरी त्यांना अपक्षांचा टेकू घ्यावाच लागतो. महापौरपदासाठी पहिले दीड वर्ष शिवसेना, त्यानंतर एक वर्ष भाजप व शेवटची अडीच वर्षे शिवसेना असा युतीचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार पहिली अडीच वर्षे सुरळीत पार पडली; मात्र राज्यात शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने यावेळी शिवसेनेला धक्का देण्याची तयारी काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केली होती. त्यात नेत्यांनीदेखील आमची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य करून हवा भरली. त्यामुळे शिवसेनेला युती होणार की नाही याविषयी धाकधूक होती. त्यातून अपक्ष नगरसेवकांसोबत ‘डील’ करण्यात आली. काही अपक्ष नगरसेवक उचल घेऊन सहलीवर रवाना झाले आहेत. युती तुटण्याची शक्‍यता गृहीत धरून त्यांना मोठ्या रकमेचा शब्द देण्यात आला होता; मात्र त्यानंतर युतीची घोषणा झाल्याने ‘आकडा’ घसरला आहे. जे मिळतील ते घ्या, अशी भूमिका सध्या अपक्षांची आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक बुधवारी सहलीवर रवाना झाले. महापौर बंगल्यावर स्नेहभोजन घेतल्यानंतर बहुतांश नगरसेवक रवाना झाले असून, अनेक जण शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.२८) सहलीवर जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: aurangabad news amc