घोषणा चारशेंची; मंजूर तेरा कोटी

आदित्य वाघमारे
रविवार, 17 डिसेंबर 2017

औरंगाबाद - शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रोडच्या रुंदीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी ४०० कोटींची घोषणा केली होती; मात्र संबंधितांनी या रस्त्यावरील केवळ चिकलठाणा ते बाबा पंपापर्यंतच्याच कामासाठी केवळ १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याचा मेकओव्हर होऊन अपघातांना आळा बसेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल, ही अपेक्षा बाळगून असणाऱ्या शहरवासीयांची दुधाची तहान तकावरच भागविली गेली.  

औरंगाबाद - शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रोडच्या रुंदीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी ४०० कोटींची घोषणा केली होती; मात्र संबंधितांनी या रस्त्यावरील केवळ चिकलठाणा ते बाबा पंपापर्यंतच्याच कामासाठी केवळ १३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याचा मेकओव्हर होऊन अपघातांना आळा बसेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल, ही अपेक्षा बाळगून असणाऱ्या शहरवासीयांची दुधाची तहान तकावरच भागविली गेली.  

हा शहरातील सर्वांत जास्त रहदारीचा मार्ग आहे. त्याचे संपूर्ण मेकओव्हर करण्यासाठी ४०० कोटींच्या निधीची घोषणा खुद्द रस्ते विकासमंत्री गडकरी यांनी केली होती; मात्र केंद्राकडून त्यासाठी प्रत्यक्षात केवळ १३ कोटींची रक्‍कम मिळाली. 

महामार्ग क्रमांक ७५३-अचा भाग दर्शविण्यात आलेल्या चिकलठाणा ते बाबा पेट्रोलपंपाच्या नऊ किलोमीटरचे काम या १३ कोटींमधून होणार असून, निविदा काढण्यात आल्यात. फेब्रुवारीपर्यंत त्यांचे सोपस्कार पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता एल. एस. जोशी यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे काम केले जाणार असून, त्यात उड्डाणपुलावरील खराब पॅचची दुरुस्तीही केली जाणार आहे. ७५३-अ या महामार्गाचा भाग दाखविण्यात आल्याने जालना रोड हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे; पण या कामानंतर या रस्त्याच्या मोठ्या प्रकल्पाच्या मंजुरीला किती आवधी लागणार हे आद्याप गुलदस्त्यात आहे.

कंत्राटदारावर ‘डिफेक्‍ट लायबिलिटी’
दोन वर्षे ‘लायबिलिटी’ (जबाबदारी) असलेल्या कंत्राटदाराला काम झाल्यावर रस्त्याची दर तीन महिन्यांनी पाहणी करावी लागणार आहे. शिवाय मुख्य अभियंत्यांनी सांगितलेल्या दुरुस्तीचे काम तीन दिवसांत सुरू करून सात दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. रस्त्यावर सुरवातीला मुरूम अंथरुण त्याआधारे रस्त्याचे लेव्हलिंग करून घेत ३० एमएमचा डांबरी थर सुरवातीला टाकण्यात येणार आहे. त्यावर ५० एमएम डांबरी सर्फेसिंग केली जाणार आहे. सेल्फ हिटिंग बिटुमीन स्प्रेयर वापरणे यात बंधनकारक असल्याने रस्त्याचा सर्फेस दर्जेदार होण्याची अपेक्षा आहे. 

दाखविले हे स्वप्न
४०० कोटींतून या रस्त्यावरील केंब्रिज ते छावणी पुलादरम्यान काम होणार आहे. त्यातून आवश्‍यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे, वाहतूक पोलिसांसाठी विशेष कक्ष, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, फुटपाथ, सायकल मार्ग, सिटी बससाठी वेगळा मार्ग, सरकते जिने, पार्किंग व्यवस्था या सुविधा दिल्या जाणार आहेत. एकूणच काय तर पाश्‍चात्य देशांतील रस्त्यांप्रमाणे या रस्त्याचे डिझाइन तयार करण्यात आलेले आहे. शिवाय या कामांमुळे या रस्त्यावर शून्य अपघात होतील, असे स्वप्न शहरवासीयांना दाखविले गेले आहे.

Web Title: aurangabad news amc