शहरात कचऱ्याचे अन्‌ महापालिकेत फायलींचे ढिगारे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

औरंगाबाद - कचऱ्याच्या प्रश्‍नामुळे आता महापालिकेत प्रलंबित फायलींचे ढिगारे साचले आहेत. तत्कालीन आयुक्तांनी कचराकोंडीत महिनाभर एकाही फायलीला हात लावला नाही. त्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम देखील ‘मी काही काळासाठी आहे, फक्त कचऱ्याचा प्रश्‍न सोडविणार’ असे सांगत असल्याने महापालिकेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. तिजोरीत खडखडाट असताना महावितरण कंपनीने वीज तोडण्याची नोटीस बजावली आहे, त्यात देखील लक्ष घालण्यास प्रभारी आयुक्तांनी नकार दिल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. 

शहराची कचराकोंडी झाल्यापासून महापालिकेतील इतर कामे ढेपाळली आहेत. गेल्या ३६ दिवसांपासून तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर व विद्यमान प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी एकाही फायलीला हात लावलेला नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा आकडा हजारोंच्या घरात गेला आहे. त्यात नगररचना विभागातील असंख्य फायलींचा समावेश आहे. या फायलींवर सह्या झाल्या, तर एका दिवसात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे सात कोटी रुपये जमा होतील. महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. त्याकडे लक्ष देण्यासही आयुक्त तयार नाहीत. अत्यावश्‍यक खर्च, महावितरणचे बिल, कंत्राटदारांची बिले असे ११० कोटींची देणी महापालिकेला आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २३) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती श्री. राम यांना दिली. त्यावर त्यांनी कचरा प्रश्न सोडून इतर समस्या नंतर बघू म्हणून हात झटकले. तत्कालीन आयुक्त मुगळीकर यांनी देखील फायली अंतिम करण्यासाठी जलश्री या त्यांच्या बंगल्यावर मागवून घेतल्या होत्या. त्या गेल्या ३५ दिवसांपासून पडून होत्या. नवे आयुक्त तरी त्यावरील धूळ झटकतील, अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे ढिगारे वाढत आहेत.

वसुलीची लागली वाट 
मार्चच्या कार्यालयीन कामकाजाचे केवळ चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, मालमत्ता कराची वसुली केवळ १८ टक्के एवढी झाली आहे. असे असताना महत्त्वाच्या विषयावर लक्ष देण्यासाठी आयुक्तांकडे वेळ नसल्याने अधिकारी अाचंबित झाले आहेत. 

महापालिकेत शुकशुकाट 
प्रभारी आयुक्त महापालिकेकडे फिरकत नसल्याने मुख्यालयात कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. त्यात महापौरदेखील तीन दिवसांच्या सहलीवर गेल्यामुळे शुक्रवारी कार्यालयात शुकशुकाट होता.

Web Title: aurangabad news amc garbage