आज ठरणार नवा महापौर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

असे आहे पक्षीय बलाबल 
शिवसेना -     २८
भाजप -         २३
एमआयएम -     २४
काँग्रेस पक्ष -     ११
राष्ट्रवादी काँग्रेस -     ०५
बहुजन समाज पार्टी - ०५
रिपाइं (डेमॉक्रॅटिक) - ०२
अपक्ष -         १७
एकूण -         ११४ 
(एक जागा रिक्त)

औरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी (ता. २९) निवडणूक होणार आहे. सकाळी अकराला महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरपदासाठी शिवसेना-भाजप युती, एमआयएम, काँग्रेस पक्षांतर्फे अर्ज भरण्यात आले असले, तरी युतीचे नंदकुमार घोडेले यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. आगामी अडीच वर्षांसाठी ही निवड राहणार आहे. दरम्यान, सहलीवर गेलेले युतीचे नगरसेवक शनिवारी (ता. २८) सायंकाळी शहरात परतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विद्यमान महापौर भगवान घडामोडे व उपमहापौर स्मिता घोगरे  यांची कार्यकाळ शनिवारी (ता. २८) संपला. त्यामुळे रविवारी नव्या महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युतीतर्फे शिवसेनेचे नंदकुमार घोडले, एमआयएमतर्फे अब्दुल नाईकवाडी, तर काँग्रेसच्या वतीने अयुब खान यांनी अर्ज भरले आहेत. उपमहापौरपदासाठी युतीतर्फे भाजपचे विजय औताडे, एमआयएमकडून संगीता वाघुले, तर काँग्रेसकडून अफसर खान व रिपाइं डेमोक्रॅटिकचे कैलास गायकवाड यांनीही अर्ज दाखल केला आहे. विशेष सर्वसाधारण सभेत हात उंचावून नगरसेवक मतदान करणार आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पीठासीन अधिकारी राहणार आहेत. दरम्यान, सहलीवर गेलेले युतीचे नगरसेवक शहरात परतले असून, सकाळी खासगी बसने ते महापालिकेत दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी होणार प्रक्रिया 
सकाळी अकराला सभेस प्रारंभ होईल. त्यानंतर महापौरपदासाठी दाखल अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर उमेदवारांना क्रमांक दिले जातील. उमेदवारांच्या क्रमांकाची घोषणा केल्यानंतर नगरसेवकांना हात उंचावून व सही करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. मतदानाच्या नोंदी घेण्यासाठी वर्ग एकच्या चार अधिकाऱ्यांच्या चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. 

विक्रमी मतांनी होणार विजयी!
तब्बल ११५ नगरसेवक असलेल्या महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत असून, शिवसेनेकडे २८, तर भाजपकडे २३ नगरसेवक आहेत; तसेच अपक्षांच्या गटाचाही पाठिंबा युतीलाच आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकींत अनुक्रमे ७१, ७२ अशी मते घेऊन त्र्यंबक तुपे व भगवान घडामोडे विजयी झाले होते. या वेळी आणखी काही अपक्षांना नंदकुमार घोडेले यांनी गळाला लावले आहे. त्यामुळे मतांचा आकडा ८० पार जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: aurangabad news amc Mayor