सात धार्मिक स्थळांचा महापालिकेने मागविला पोलिसांकडून अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शहरातील सात अनधिकृत धार्मिक स्थळे रस्त्याला अडथळा निर्माण करणारी असल्यामुळे याबाबत महापालिकेने पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. 

औरंगाबाद - शहरातील सात अनधिकृत धार्मिक स्थळे रस्त्याला अडथळा निर्माण करणारी असल्यामुळे याबाबत महापालिकेने पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. 44 अनधिकृत धार्मिक स्थळे काढल्यानंतर महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवर आक्षेप सादर करण्यासाठी व त्यावर सुनावणी घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती न्यायालयात केली होती. न्यायालयाने विनंती मान्य करून सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाडापाडीची कारवाई थांबविली. धार्मिक स्थळांची नव्याने यादी जाहीर करून त्यावर आक्षेप मागवले होते. 976 आक्षेप दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 942 आक्षेप निकाली काढण्यात आले असून चार आक्षेप राज्यस्तरीय समितीकडे सुनावणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सात धार्मिक स्थळांची सुनावणी समितीमार्फत घेण्यात आली. यामध्ये हनुमान मंदिर, जाधवमंडी येथील जागृत महादेव मंदिर, केळीबाजार रोडवरील आस्ताना, खाराकुआँमधील शनिमंदिर, क्रांती चौकातील मशीद, एन-सात मधील हनुमान मंदिर, मुकुंदवाडीतील बौद्ध विहार या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. ही धार्मिक स्थळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी आहेत का, तसेच लोकमान्यता प्राप्त आहेत का, याची माहिती घेऊन पोलिसांनी अहवाल द्यावा, असे महापालिकेने कळविले आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धार्मिक स्थळांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Web Title: aurangabad news amc Religious place police

टॅग्स