मुजोर रिक्षाचालकांची बसचालकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - मध्यवर्ती बसस्थानकातून बस बाहेर काढणाऱ्या चालकास तीन ते चार रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांनी पळ काढला. ही घटना मंगळवारी (ता. सहा) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.  

चिकलठाण्याकडे जाणारी एक शहरबस मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर येत होती. त्या वेळी गेटजवळ उभ्या असलेल्या रिक्षा चालकाने विरुद्ध दिशेने रिक्षा बसकडे आणली. त्यानंतर बस चालकाने बस मागे घेतली. त्यावरून दोघांत वाद झाला. दरम्यान, तीन ते चार रिक्षाचालक थेट बसमध्ये घुसले. त्यांनी बस चालक रमेश्‍वर काळे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच बसस्थानकातील एसटीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत मारहाण करणारे फरार झाले. या घटनेमुळे सिद्धार्थ उद्यानाकडून मिलकॉर्नरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अनोळखी रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद 
शहराच्या सुरक्षितेसाठी सेफ सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या रिक्षाचालकांचा मुजोरपणा कैद झाला आहे. बसचालक काळे यांनी पोलिस आयुक्‍तालयात जाऊन या फुटेजची पाहणी केली. त्यात त्यांनी मारहाण करणाऱ्यांना ओळखले. 

हा प्रकार निंदनीय आहे. आम्ही या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या संदर्भात बुधवारी (ता. सात) विभाग नियंत्रकांसह पोलिस आयुक्‍तांची भेट घेणार आहोत.  
- स्वप्नील धनाड, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक.

Web Title: aurangabad news auto rickshaw