ऑनलाइन रिक्षा परवान्यासाठी ‘आरटीओ’चा मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आलेले आहेत. आता हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने परत भरून देण्याचा आदेश काढण्यात आला होता. ही किचकट प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘सकाळ’च्या पाठपुराव्यांतर अखेर शनिवार (ता. पाच) व रविवारी (ता. सहा) अशा दोन दिवस आरटीओ कार्यालयात रिक्षाचालकांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आलेले आहेत. आता हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने परत भरून देण्याचा आदेश काढण्यात आला होता. ही किचकट प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘सकाळ’च्या पाठपुराव्यांतर अखेर शनिवार (ता. पाच) व रविवारी (ता. सहा) अशा दोन दिवस आरटीओ कार्यालयात रिक्षाचालकांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

राज्य शासनाने १७ जूनला रिक्षांचे परमिट खुले करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला अर्ज नेमके कसे स्वीकारावे हे निश्‍चित नव्हते. संभ्रमावस्था असताना औरंगाबाद कार्यालयात रोज परमिटसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात जवळपास एक हजार अर्ज आरटीओ कार्यालयाकडे प्राप्त झाले. या अर्जांची छाननी झालेली असतानाच परिवहन विभागाने राज्यभर परमिटचे अर्ज राज्यभर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा नव्याने निर्णय घेतला. त्यामुळे आरटीओ कार्यालयात जमा अर्ज पुन्हा ताब्यात घेऊन ऑनलाइन भरून देण्याचा आदेश काढण्यात आला. निर्णय बदलल्याने पूर्वी कार्यालयात अर्ज जमा केलेल्या रिक्षाचालकांची पंचायत झाली. कार्यालयात जमा केलेले अर्ज पुन्हा ताब्यात घेऊन नव्याने भरून देणे ही अवघड बाब असल्याने ‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला, ही प्रक्रिया आरटीओ कार्यालयानेच पूर्ण करावी, यासाठी पाठपुरावा केला. अखेर प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी पुढाकार घेत ही प्रक्रिया आरटीओ कार्यालयाकडून करून घेण्याचा निर्णय घेतला. नवीन परमिटसाठी रिक्षाचालकांनी कार्यालयातील अर्ज ताब्यात घेऊन केवळ ऑनलाइन शुल्क भरून पुन्हा अर्ज तसेच जमा करावे, बाकी अर्ज ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया कार्यालयामार्फत करून घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

त्यासाठी शनिवार (ता. पाच) व रविवार (ता. सहा) अशा दोन दिवस कार्यालयात केवळ याच रिक्षांच्या परमिटचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन परमिटसाठी अर्ज केलेल्या रिक्षाचालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहेत. 

केव्हाही परमिट उपलब्ध 
रिक्षा परमिट नेहमीसाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापुढे मागणी कराल तेव्हा परमिट मिळणार असल्याने रिक्षाचालकांनी गर्दी करू नये. ज्यांनी परमिट खुले झाल्यानंतर कार्यालयात अर्ज भरून दिले अशा, जुन्या रिक्षाचालकांनीच विशेष मोहिमेत सहभागी होऊन परमिटची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.

Web Title: aurangabad news autorickshaw rto