बैजू पाटील यांना नेचर बेस्ट एशिया पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

औरंगाबाद -  वन्यजीव छायाचित्रणात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जपानचा नेचर बेस्ट एशिया पुरस्कार घोषित झाला. गोवा येथे काढलेल्या बेडकाच्या छायाचित्राची आशियातील साडेआठ हजार छायाचित्रांतून ‘हायली ऑनर्ड’ प्रकारात निवड झाली. सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या छायाचित्राला हा पुरस्कार मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात जपान येथील टोकियोमध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. 

बैजू यांनी गोव्यातील महावीर अभयारण्यात ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’चे पुरस्कार प्राप्त छायाचित्र काढले आहे. विशेष म्हणजे हा बेडूक केवळ कोकण आणि गोव्यातच आढळतो. त्याचा रंग पूर्णपणे हिरवा असून, पावसाळ्यात तो जास्त सक्रिय असतो. एखादा कोळी झाडांच्या पानांवर जसा फिरतो त्याप्रमाणेच हा बेडूक फिरत असतो. धो-धो पावसातच त्याचे छायाचित्र काढावे लागते. बैजू यांनी कॅमेरा, फ्लॅशला पूर्णपणे प्लॅस्टिकने झाकून अतिशय घनदाट जंगलात हे छायाचित्र टिपले आहे. छायाचित्रणासाठी या बेडकाला शोधणे आव्हानात्मक काम आहे. त्याच्या आवाजावरून त्याचा माग काढावा लागतो. साप, विंचू आणि दलदलीच्या भागात अतिशय सांभाळून जावे लागते. बैजू यांनाही या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर त्या बेडकाचे छायाचित्र टिपण्यात यश आले. 

बैजू पाटील यांनी आतापर्यंत शाळा, महाविद्यालयांमध्ये पर्यावरण आणि प्राणी वाचविण्यासंदर्भात जनजागृतीपर अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आतापर्यंत त्यांना वन्यजीव छायाचित्रणातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. बैजू यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात आशियामध्ये भारताचे नाव प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: aurangabad news baiju patil