गंगापूर ठाण्याचा फौजदार मुठाळ हजाराची लाच घेताना जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद -  एक हजाराची लाच घेताना गंगापूर पोलिस ठाण्याचा फौजदार भागवत सुधाकर मुठाळ (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (ता.२५) दुपारी दोनच्या सुमारास गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

औरंगाबाद -  एक हजाराची लाच घेताना गंगापूर पोलिस ठाण्याचा फौजदार भागवत सुधाकर मुठाळ (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (ता.२५) दुपारी दोनच्या सुमारास गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

मुठाळविरुद्ध लाचलुचपत विभागात तक्रार देणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्याविरुद्ध एका प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यात न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली व गंगापूर ठाण्यात हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते. अकरा ऑक्‍टोबरला गंगापूर ठाण्यात तक्रारदार शेतकरी आले असता, या गुन्ह्याचा तपास अधिकारी असलेल्या मुठाळ याने त्यांना धमकावले. ‘प्रत्येक हजेरीस येताना दोन हजार रुपये आणून द्यावेत; अन्यथा हजेरी लागणार नाही तसेच हजेरीला येत नसल्याचा अहवाल न्यायालयाला पाठवेल व जामीन रद्द करेल’ अशी धमकी दिल्याने तक्रारदार शेतकरी हतबल झाले; परंतु मुठाळ यांची मागणी मान्य असल्याचे सांगत ते ठाण्यातून निघून गेले. मुठाळविरुद्ध त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाचलुचपतच्या पथकाने पडताळणी केली तेव्हा मुठाळ याने तडजोड करून एक हजार देण्याची मागणी केली. तक्रारदार शेतकऱ्याने पैसे देताच पथकाने मुठाळ याला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध गंगापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, निरीक्षक एस. एस. शेगोकार, गणेश पंडुरे, अश्‍वलिंग होनराव, भीमराज जिवडे, गोपाल बरंडवाल, आयशा शेख, दिलीपसिंग राजपूत यांनी केली. 

Web Title: aurangabad news Bribe