जिन्सीत दुचाकींचे जळीतकांड!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - वाहन पेटविण्याचे प्रकार थांबल्यानंतर पुन्हा जिन्सी भागात एकाच रात्रीत चार दुचाकी पेटवून दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ११) पहाटे तीननंतर घडला. यात एका दुचाकीचे टायर फुटून आवाज झाल्याने नागरिक गोळा झाले. त्यामुळे दुचाकींचे उर्वरित नुकसान टळले. विशेषत: पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच हा प्रकार घडला.

औरंगाबाद - वाहन पेटविण्याचे प्रकार थांबल्यानंतर पुन्हा जिन्सी भागात एकाच रात्रीत चार दुचाकी पेटवून दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ११) पहाटे तीननंतर घडला. यात एका दुचाकीचे टायर फुटून आवाज झाल्याने नागरिक गोळा झाले. त्यामुळे दुचाकींचे उर्वरित नुकसान टळले. विशेषत: पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच हा प्रकार घडला.

जिन्सी पोलिस ठाण्यालगत जुन्या खासगेट परिसरात नालीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहने ने-आण करण्यास मोठा अडसर होत आहे. यामुळेच या भागातील स्थानिकांनी दुचाकी खासगेट परिसरात साखळीने कुलूप लावून उभा केल्या होत्या. पहाटे तीननंतर अज्ञात माथेफिरू आला. त्याने चारही दुचाकीवर पेट्रोल ओतले. त्यानंतर दुचाकी पेटवून दिल्या. दुचाकींना आगीने वेढल्यानंतर दुचाकीचे टायर फुटले व मोठा आवाज झाला. आवाजाने जाग येऊन सय्यद मकसूद अलीम जागी झाले. त्यांना धूर व बाहेर पेट दिसला. दुचाकी पेटल्याचे दिसताच त्यांनी अन्य स्थानिकांना आवाज देऊन दुचाकीकडे धाव घेतली. दरम्यान, काहीतरी अघटित घडल्याचे लक्षात आल्याने स्थानिकांनी पटापट दरवाजे उघडून बचावकार्य सुरू केले. पेटलेल्या दुचाकीवर पाणी ओतून त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.

आग व आरडाआरेड पाहून घटनास्थळी जिन्सी पोलिस पोचले. त्यांनी मदतकार्य केले. या घटनेनंतर सय्यद मकसूद यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तपास उपनिरीक्षक यशवंत घोडके करीत आहेत. 

या आहेत पेटवलेल्या दुचाकी
माथेफिरूने राशेद खान यांची दुचाकी (क्र. एमएच २०, ईए २५९४), सय्यद मकसूद अलीम यांच्या दोन दुचाकी (क्र. एम. एच. २० बी. एस. ६६४४ व एम. एच. २० सी. एफ. ६६४४) तर मोहम्मद अय्युब यांची दुचाकी (क्र. एम. एच. २६ क्‍यू. ४३२७) या चार गाड्या पेटवून दिल्या.

पोलिस जाताच केले कृत्य
सूत्रांनी माहिती दिली, की जिन्सी पोलिसांचे गस्तीवरील वाहन खासगेट भागात येऊन गेले. त्या वेळी दुचाकी सुस्थितीत होत्या. परंतु, यानंतर काही वेळातच अज्ञात माथेफिरूकडून दुचाकी पेटविल्याचा प्रकार घडला.

Web Title: aurangabad news Burning scandal