चंद्रकांत खैरे-अंबादास दानवे यांचे मनाेमिलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र रविवारी (ता. २८) पाहायला मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘निर्धार शिवशाहीचा’अंतर्गत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बऱ्याच दिवसांनी हे दोघे एकत्र दिसले. तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रविवारी शहरातील पाटीदार भवनात हा मेळावा घेण्यात आला.

रामदास कदम यांची पालकमंत्री म्हणून खांदेपालट केल्यानंतर २३ जानेवारीला शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत खैरे यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली होती. त्यानंतर ‘आता मीच बॉस’ असे सांगत चंद्रकांत खैरे यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेतर्फे आयोजित रोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर अंबादास दानवे यांच्यासोबत चंद्रकांत खैरे यांनी लावलेली हजेरी हे त्याचेच उदाहरण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दादा समर्थक, खैरे समर्थक असा शिक्का बसलेले अनेक पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेना कार्यकर्त्यांनादेखील खैरे-दानवे एकाच व्यासपीठावर आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

शिवसेना नेतेपदाची जबाबदारी सोपविताना मुंबईच्या पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले होते. त्याचे परिणाम दिसायला सुरवात झाली आहे.

दोन घटनांनी बदलले राजकारण
तीन महिन्यांपूर्वी बुथप्रमुखांची यादी देण्यावरून संस्थान गणपती येथे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यात बरीच ‘तू-तू, मैं-मैं’ झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांच्या समोर येणे टाळत होते; परंतु १७ जानेवारीला रामदास कदम यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी आणि २३ जानेवारीच्या शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत खैरे यांची नेतेपदी झालेली बढती या दोन घटनांनी जिल्ह्यातील राजकारण बदलले. नेतेपदाची जबाबदारी आल्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी गटबाजीला थारा न देता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची नुसती भूमिकाच घेतली नाही, तर त्या दिशेने वाटचाल देखील सुरू केली. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीदेखील चंद्रकांत खैरे यांचे नेतृत्व मान्य करीत पुढे पाऊल टाकल्याचे दिसते.

Web Title: aurangabad news chandrakant khaire and ambadas danve compromise