‘समांतर’चा चेंडू ‘मातोश्री’च्या कोर्टात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेला विरोध करणाऱ्यांना आता उपरती आली आहे. शहराला पाणी मिळणे गरजेचे असल्यामुळे लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी (ता. २६) स्पष्ट केले. 

औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेला विरोध करणाऱ्यांना आता उपरती आली आहे. शहराला पाणी मिळणे गरजेचे असल्यामुळे लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन योजनेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी (ता. २६) स्पष्ट केले. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिका मुख्यालयात सोलर पॅनेल बसविण्याच्या कामाचा शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर डॉ. सावंत, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे, नगरसेवक राजू वैद्य, गंगाधर ढगे, शोभा बुरांडे, नितीन साळवी, स्वाती नागरे, कैलास गायकवाड, रूपचंद वाघमारे, सचिन खैरे, नगरसेविका मीना गायके, सुनीता आऊलवार, आयुक्त डी. एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची उपस्थिती होती.

पुढे खैरे म्हणाले, की मी धडपड करून समांतर, भूमिगत गटार योजना आणली. भूमिगतचे काम पूर्णत्वाकडे आहे; मात्र समांतर अजूनही रखडलेली आहे. शहरातील काही अतिउत्साही नेत्यांनी राजकारण करीत योजना बंद पाडली. आता तेच पाणी द्या म्हणत आहेत. ही योजना पीपीपी तत्त्वावर राबविण्याचे ठरलेले आहे आणि महापालिकेने करार रद्द केला आहे. आता दुसऱ्या पद्धतीने काम करता येणार नाही. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तोडगा काढावा लागणार आहे. तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घ्या, त्यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी गळ खैरे यांनी डॉ. सावंत यांना घातली. 

सर्वांना सोबत घेऊन काम करणार 
पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळात काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ हा माझ्या हस्ते होत असल्याने तो शुभशकुन आहे. दोन वर्षांत शहराला स्मार्ट सिटीतील कामांची फळे मिळतील, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रविणा कन्नडकर यांनी केले.

वीजबिलात होणार दीड लाखाची बचत
महापालिकेच्या मुख्यालयावर सौर पॅनेल बसविल्यानंतर प्रतिदिन पाच हजार रुपयांच्या वीजबिलाची बचत होणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. या प्रकल्पावर ५३ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

Web Title: aurangabad news chandrakant khaire talking